घरमहाराष्ट्रइंदोरीकरांचा ‘तो’ सल्ला उरणच्या किर्तनातला! स्पष्टीकरणातही घोळ

इंदोरीकरांचा ‘तो’ सल्ला उरणच्या किर्तनातला! स्पष्टीकरणातही घोळ

Subscribe

इंदोरीकर महाराजांनी ते वादग्रस्त वक्तव्य रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात केल्याचं समोर येत आहे.

कीर्तनातून पुत्रप्राप्तीचे मंत्र देणार्‍या निवृत्ती महाराज देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराज यांचा पाय आता आणखी खोलात जाऊ लागला आहे. ‘नगरमध्ये किर्तनात मी असं काही बोललोच नाही’, ही पळवाट त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यांनी दिलेले पुत्र प्राप्तीचे सल्ले नगरमध्ये नव्हे, तर रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात दिल्याचं स्पष्ट झालं आहे. आरोग्य संचलनालयाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर माफीनामा देणार्‍या इंदोरीकरांनी ‘आपण नगरमध्ये असं काही बोललोच नाही’, असं सांगण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्याबाबतचे पुरावेही यूट्यूबवरून हटवण्यात आले आहेत. या खुलाशाने इंदुरीकर यांना हायसं होत असतानाच त्यांच्या सल्ल्याचे नवे पुरावे हाती आले आहेत.त्यांनी ते सल्ले उरण येथे इंचगिरी सांप्रदाय या वारकरी संस्थेच्या व्यासपीठावर दिल्याचं उघड झालं आहे.

२ जानेवारीला झालं होतं वादग्रस्त कीर्तन

‘नगरमधील कीर्तनामध्ये ‘मी असे काही बोललोच नाही आणि मी असे कीर्तन केलेच नाही’, असा स्वत:ला नामानिराळं ठेवण्याचा प्रयत्न निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी गुरुवारी नव्याने केला होता. त्याआधी बुधवारी त्यांनी जाहीर पत्रकाद्वारे झालेल्या चुकीवर माफीनामा लिहून दिलगिरी व्यक्त केली होती. पण कारवाईची शक्यता दिसू लागताच पळवाट शोधू पाहणार्‍या महाराजांच्या किर्तनातील नवे पुरावे पुढे आले आहेत. उरण तालुक्यातील प्रसिद्ध अशा इंचगिरी सांप्रदायाच्या विद्यमाने ३१ डिसेंबर ते ७ जानेवारी या दरम्यान हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्नवरीच्या वाचनाचे आयोजन कोटनाका येथील राघोबा मंदिरात करण्यात आले होते. मंडळाकडून नामांकित अशा कीर्तनकारांना या निमित्त पाचारण करण्यात आले होते. यात २ जानेवारीच्या गुरुवारी निवृत्तीमहाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन होते. याच कीर्तनात त्यांनी पुत्र प्राप्तीचे उपदेश दिल्याचे उघड झाले आहे. याआधी उरणशिवाय आणखीही काही ठिकाणच्या कीर्तनात त्यांनी पुत्रप्राप्तीचे सल्ले दिल्याचं यूट्यूबवरील चित्रफितीत आढळून आले आहे.

- Advertisement -

सविस्तर वाचा – इंदोरीकर महाराजांचा खुलासा, ‘मी तसं बोललोच नाही!’

युट्यूब-टिकटॉकवर वक्तव्य व्हायरल

‘जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मी नगरमध्ये कीर्तन केलेले नाही. नगरमधील कोणत्याच कीर्तनात आपण हा उल्लेख केला नसल्याचे’ महाराज सांगत होते. ‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होते’ हे इंदोरीकरांचे वक्तव्य यूट्यूब आणि टिकटॉक या सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे वक्तव्य इंदोरीकर यांनी कोणत्या कीर्तनामध्ये केले, याची अधिक माहिती घेतली असता त्यांनी हा उल्लेख उरणमध्ये २ जानेवारीला तसेच अन्य काही ठिकाणी केल्याचे युट्यूबवरील व्हिडिओतून दिसून येते.

युट्यूब चॅनलवर दबाव

इंदोरीकर यांनी केलेले स्पष्टीकरण हे दिशाभूल करणारे असल्याने त्यांच्या स्पष्टीकरणातील तथ्य पडताळणे हे नगरच्या पीसीपीएनडीटी समिती तथा जिल्हा समुचित प्राधिकरणासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. युट्यूब चॅनेलने इंदोरीकर महाराज यांच्या वक्तव्याचे व्हिडिओ डिलीट करावेत यासाठी त्यांच्या समर्थकांकडून युट्यूब चॅनेल चालवणार्‍यांवर दबाव टाकण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातून इंदोरीकर महाराज समाजाची आणि पीसीपीएनडीटी समितीची दिशाभूल करत असल्याचे दिसून येत आहे.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -