इंदुरीकर महाराजांना ७ ऑगस्टला संगमनेर न्यायालयात उपस्थितीचे आदेश

वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत

Nashik
indurikar maharaj
Indurikar Maharaj ordered to appear in Sangamner court on 7th August

संगमनेर : पुत्रप्राप्तीच्या विधानावरुन अडचणीत सापडलेल्या समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या अडचणीत गुरुवारी वाढ झाली. न्यायालयात त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत न्यायालयाने आज त्यांच्याविरोधात प्रोसेस इश्यु केली आहे. त्यामुळे इंदोरीकरांना आता ७ ऑगस्टला संगमनेर न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे.

पुत्रप्राप्तीचा मंत्र आपल्या कीर्तनातून देणाऱ्या निवृत्ती महाराजांविरोधात पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संगमनेर न्यायालयात घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांनी तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात न्यायाधीश पी. डी. कोळेकर यांच्यासमोर कामकाज झाले. सरकारी वकील लिना चव्हाण यांनी सरकारची बाजू मांडली. सम तिथीला स्त्री संग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर संतती रांगडी, बेवडी खानदान मातीत मिळविणारी होते, असे वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकरांनी आपल्या कीर्तनातून केले होते.

दैनिक ‘आपलं महानगर’ने यासंदर्भातील वृत्त सर्वप्रथम प्रसिध्द केल्यानंतर इंदुरीकरांविरोधात विविध संघटना पुढे आल्या होत्या. त्यांनी इंदुरीकरांवर कारवाईची मागणी केली होती. अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या सचीव अॅड. रंजना गवांदे यांनी यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली होती. मात्र, आरोग्य यंत्रणेकडून दबावामुळे इंदुरीकरांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करत त्यांना नोटीस बजावली होती. यात जिल्हा शल्य चिकीत्सकांनी जर न्यायालयात तक्रार दाखल केली नाही तर त्यांनी गुन्हेगारास पाठीशी घातल्याच्या कारणावरुन त्यांना सहआरोपी करत न्यायालयात तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला होता. यासंदर्भातील पुरावेदेखील त्यांनी सादर केले होते.

दरम्यानच्या काळात कोरोना विषाणुचा संसर्ग वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर कामाचा ताण वाढला. मात्र, १९ जूनला ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी भास्कर भवर यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली. येत्या ७ ऑगस्टला इंदुरीकर यांना आपल्या वकिलामार्फत न्यायालयात उपस्थित राहुन जामीन द्यावा लागणार आहे. यासाठी त्यांना समन्स काढत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश काढण्यात आले.