इंदुरीकर महाराजांचा मुद्दा अधिवेशनात गाजणार

आमदार विद्या चव्हाणांची गृहमंत्र्यांकडे तक्रार

Mumbai
Indurikar Maharaj
इंदुरीकर महाराज

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांना प्रसिद्धी मिळत असल्याने त्यांना आता भान राहिलेले नाही. ते आपल्या प्रत्येक भाषणात महिलांविरोधात बोलत असतात. त्यामुळे अशा महाराजाविरोधात गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्यास आम्ही अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करत सरकारला जाब विचारू, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी घेतली. तसेच यासंबंधी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रारही केली.

इंदुरीकर महाराज हे नेहमीच आपल्या भाषणातून महिलांवर टीका करतात.इंदुरीकरांना आता भरपूर प्रेक्षक मिळाले व माईक हातात असल्याने त्यांना भान राहिले नाही. सातत्याने महिलांविरोधात अभद्र बोलणार्‍या या महाराजाचा मुद्दा 5 मार्च रोजी अधिवेशनात हिंगणघाटमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर महिलांवर होणार्‍या अत्याचारासंदर्भातील चर्चेच्या वेळी उपस्थित करणार आहे.

इंदुरीकर महाराजांविरोधात कारवाई करण्यास विलंब झाल्यास अधिवेशनात या मुद्यावरून सरकारला जाब विचारणार असल्याचेही आमदार चव्हाण यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले. कीर्तनाला येणारे लोक भाबडे असतात, त्याचा फायदा घेऊन इंदुरीकर महाराज मुलींपेक्षा मुले कसे श्रेष्ठ आहेत, हे सांगतात. पण आज सर्वच क्षेत्रात मुली ह्या मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याबरोबरच मुलांपेक्षा आघाडीवर असतात.

शिक्षणापासून संरक्षण क्षेत्रामध्ये मुलींनी स्वत:ला सिद्ध केले आहे. असे असतानाही हा महाराज महिलांविरोधात नेहमीच बदनामीकारक वक्तव्य करत असतो. त्यामुळे त्याच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी मी गृहमंत्र्यांना विनंती करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here