घरमहाराष्ट्रऊसतोंडणी कामगाराचा मुलगा ते 'पुढारी'चा मालक!

ऊसतोंडणी कामगाराचा मुलगा ते ‘पुढारी’चा मालक!

Subscribe

आलम शेखचा बनला आलम 'पुढारी' आपल्या कापड व्यवसायामुळे आलम शेख ही ओळख मागे पडून आलम पुढारी अशी नवी ओळख त्याला मिळाली. यामागेही थोडी रंजकच गोष्ट आहे. कपड्याचा व्यवसाय करताना आलमने एक व्हिजीटींग कार्ड छापले होते, त्यामध्ये त्यांने आपले आलम हे नाव व आपल्या नवीन चालत्या- फिरत्या दुकानाचे नाव पुढारी वस्त्रदालन असे ठेवले. पुढे पुढे आलम व पुढारी अशी एकच ओळख तयार झाल्याने लोक आलमला, आलम पुढारी याच नावाने ओळखू लागले.

मंत्रालयाच्या बाहेर आकाशावणी परिसरात इंडिका कारमधून कपडे विकणारा एक तरुण नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. सर्वांशी हसतमुख व आपुलकीने वागणाऱ्या या तरुणाने अल्पावधीतच कापड व्यवसायात आपला चांगलाच जम बसविला. आज सर्वसामान्य राजकीय कार्यकर्त्यांपासून ते अगदी नेत्यांपर्यंत सर्वजणच त्याच्या कपड्यांचे ग्राहक आहेत. आलम बशीर शेख असे या युवकाचे नाव. परंतु कपड्याच्या व्यवसायाने आलमची ही ओळख मागे पडून आलम ‘पुढारी’ अशी नवी ओळख त्याला लाभली.

आलम तसा मुळचा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील चिखली (नाथ) या गावचा रहिवासी. आई – वडील हे दोन्ही ऊसतोडणी मजूर त्यामुळे साहजिक आपल्या मुलाने देखील या ऊसतोडणीच्या टोळीत सहभागी होऊन आपल्या सोबत काम करावे, अशी त्यांची इच्छा होती. परंतु, सुरुवातीपासूनच काहीसा बंडखोर स्वभावाच्या आलमला स्वतःचे विश्व खुणावत होते. त्यामुळे एक दिवस घरातून पळून त्याने मुंबई गाठली. तसे पाहिले तर मुंबईत आल्यानंतर आलमचे जवळचे असे कोणीच नातेवाईक नव्हते.

- Advertisement -

एखाद्या फिल्मस्टोरीसारखी त्याची कथा आहे. मुंबईत आल्या-आल्याच सुरवातीला त्याचे सर्व साहित्य चोरीला गेले, त्यामुळे अंगावर असलेले कपडे आणि खिशात राहिलेली शंभर रुपयांची नोट इतकेच काय ते त्याच्याजवळ राहिले. एक प्रकारे नियती त्याची परीक्षाच पाहत होती. परंतु, अशा संकटकाळी कोणी ना कोणी देव बनून मदतीला येत असतेच. तेंव्हा बीड जिल्ह्यातील एक ओळखीचा व्यक्ती त्याला भेटला, त्या व्यक्तीमुळेच केवळ उत्सुकतेपोटी आयुष्यात पहिल्यांदा मंत्रालय काय असते ते आलमला पाहायला मिळाले, आणि तिथूनच आलमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

आलम नोकरीच्या शोधत होताच, पण नोकरी काही मिळत नव्हती. एखाद्या मंत्र्यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून तरी नोकरी मिळावी म्हणून आलम मंत्रालयात जात होता. पण त्याला ती नोकरी काही मिळाली नाही. लवकरच आलमच्या लक्षात आले की आता जे काही करायचे ते स्वतःच्या हिमतीवर आणि जिद्दीवरच, मंत्रालयात राज्यभरातून येणारे-जाणारे पांढऱ्या कपड्यातील कार्यकर्ते, नेते पाहिले की आलमला नेहमीच त्यांचे आश्चर्य वाटायचे आणि या पांढऱ्या कपड्यातूनच आलमला त्याच्या नव्या व्यवसायाची आयडिया सुचली. परंतु, प्रश्न भांडवलाचा होता. त्यावेळी त्याने त्याच्या गळ्यातील काळ्या दोऱ्याला बांधलेले सोन्याचा बदामासारखा दागिना सोनाराकडे विकला. त्यातून काही रक्कम त्याच्या हाती आली. तीच रक्कम त्याने आपल्या नव्या व्यवसायासाठी भांडवल म्हणून वापरली. सुरुवातीला या व्यवसायात जम बसविण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले परंतु न खचता न डगमगता आलमने आपला व्यवसाय चालू ठेवला. हळू-हळू ओळखी वाढत गेल्या, कपडे विक्रीच्या निमित्ताने नेत्यांशी परिचय वाढत गेला. आज आलमने स्वतःच्या व्यवसायात चांगला जम बसविला. बड्या नेत्यांपासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यत अनेकजण या गाडीला भेट देतात.

- Advertisement -

महाराष्ट्रतील सर्वच पक्षांचे प्रमुख नेते हे आलमच्या पांढऱ्या कपड्यांचे ग्राहक आहेत. कारण नेत्यांना, कार्यकर्त्याना जसे रुबाबदार कपडे हवे असतात तसे खास त्यांच्या पसंतीचे कपडे आलम त्यांना विकतो. खादी आणि लिननचे कपडे. त्याच्या या शॉपच नाव ‘पुढारी’ असं ठेवलं आहे. त्याच्या टॅगलाईन प्रमाणेच त्याने काम करून बऱ्याच ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण केला.

आमदार सुजितसिंह ठाकूर हे आलमच्या कपडा व्यवसायातील पहिले ग्राहक त्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे आलमच्या व्यवसायाची सुरुवात चांगली झाली. तसेच माजी आमदार बाबाजान दुर्रानी यांनी आलमच्या व्यवसायाला पाठबळ तर दिलेच शिवाय मुंबईसारख्या ठिकाणी आलमसाठी स्वतःची आमदार निवासातील खोली राहायला दिली. आज राज्यातील सर्वच पक्षाचे मोठे नेते आमच्या कपड्यांचे ग्राहक आहेत. यामध्ये राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ.अबु आझमी, सुभाष साबणे, भिमराव धोंडे, अमरसिंह पंडित, जयवंत जाधव तसेच सर्वच पक्षाचे आमदार, प्रमुख पदाधिकाऱी यांचा यात समावेश आहे, असे आलम सांगतो.

या व्यवसायासाठी लागणारे कापड आलम पंजाब राज्यातील अमृतसर येथून मागवतो. तसेच नेत्यांनी दिलेल्या ऑर्डरप्रमाणे तसेच त्यांच्या मापानुसार आलम त्यांना कपडे शिवून देतो. त्यासाठी आलमने त्याच्या गावाकडून एक नामांकित टेलरला मुंबईत आणले आहे व त्याला मुंबईतच सर्व काम पुरविले आहे. या व्यवसायातून आलम दिवसाला ३० ते ४० हजार रुपये कमावतो, तर महिन्याला १० ते १२ लाखांचा व्यवसाय करतो.

या व्यवसायामुळे प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आलमची ओळख निर्माण झाली आहे. आता तर या व्यवसायासाठी त्याने स्वतःची गाडी खरेदी केली आहे आणि लवकरच आकाशवाणी परिसरात तो स्वतःचे कपड्याचे दुकान सुरु करतो आहे. घरच्या गरिबीला कंटाळून घरातून पळून आलेला एक ऊसतोडणी कामगाराचा मुलगा मेहनतीने आणि जिद्दीने कशाप्रकारे प्रगती करु शकतो, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आलम शेख!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -