टपरीचालक ते पोलीस उपनिरीक्षक आदीवासी तरुणाचा प्रेरणादायी प्रवास

संतोष लहानपणापासून तसा हुशार पण परिस्थितीपुढे हतबल झालेला. त्याचे प्राथमिक ते पदवीपर्यंत शिक्षण राजुर येथे झाले.

Rajur

जिद्द, संयम आणि चिकाटी जर आपल्याजवळ असेल तर आपण यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात राजुर गावाजवळच्या एका वाडीत राहणारा मुलगा, ज्याचं नाव आहे संतोष वाळु देशमुख. त्याच्या यशाची अन्य तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आई आणि वडील दोघेही शेतमजूर, कुटुंब चालविण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. वाळू देशमुखांना दोन एकर कोरडवाहू शेती, दोन-चार पोती भात पिकणार यावर संपूर्ण घर चालवायचं. हा संघर्ष संतोष जवळून पाहत होता. दोन मुलं आणि एक मुलगी या सगळ्यांचा सांभाळ करायचा असेल तर कष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हता.

संतोष लहानपणापासून तसा हुशार पण परिस्थितीपुढे हतबल झालेला. त्याचे प्राथमिक ते पदवीपर्यंत शिक्षण राजुर येथे झाले. अर्थशास्त्र या विषयातून त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले नंतर मित्रांच्या आर्थिक मदतीने तो पुण्याला पुढील शिक्षणासाठी गेला तेथे प्रा. डॉ. सुरेश देशमुख यांच्या मदतीने त्याला एसपी कॉलेजमध्ये एमएसाठी प्रवेश मिळाला. संतोषला राहण्याची सोय तेथे नव्हती. खूप प्रयत्न करून तो  मित्राच्या रूमवर राहू लागला. नंतर परत तो गावी आला, त्याने पान टपरीवर काम करायला सुरुवात केली. याचकाळात अहमदनगरचे पोलीस अधीक्षक म्हणून कृष्ण प्रकाश यांनी कार्यभार हाती घेतला होता. संतोष कृष्णप्रकाश यांच्या पोलीस खात्यातील कार्यावर खूप खुश झाला व त्याने असे ठरवले की आपण खूप अभ्यास करून पोलीस खात्यातच नोकरी करावी. म्हणून तो पुन्हा पुण्याला गेला तेथे त्याने अभ्यास करायला सुरुवात केली.

आपण आयुष्यात काहीतरी चांगलं करावं या उद्देशाने त्यांने प्रचंड मेहनत केली. त्याला जाणीव होती की आपले आई-वडील आपल्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. आई तर असवल्या डोंगरावरून गवताचा भारा घेऊन राजूरच्या बाजारात विकायला येते. तो एक भारा अवघ्या ५० ते ६० रुपयाला विकला जातो. ६० रुपये मिळवण्यासाठी ती माऊली ७ किलोमीटर पायपीट करते तर वडील भल्या पहाटे उठून त्याच डोंगरावर शेळ्या वळायला जातात. संतोषने आई वडिलांचा हा संघर्ष जवळून पाहिला होता, प्रशांत भांगरे या संतोषच्या मित्राने पुण्यात येऊन एमपीएससीचा अभ्यास करायला सुरुवात कर असा सल्ला दिला. यातूनच सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत संतोष सातत्याने अभ्यास करत राहिला सकारात्मक विचार करणाऱ्या मित्रांचा सहवास मिळाल्यामुळे व प्रचंड आत्मविश्वास व कठोर परिश्रम यामुळे संतोष २०१८ च्या एमपीएससी परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक झाला.

अनुसूचित जमाती(एस.टी)मध्ये तो राज्यात ७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. काहीतरी वेगळं करून दाखवण्याची त्याची इच्छा आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाली. तो पास झाल्याची बातमी गावी समजली त्याही दिवशी त्याची आई गवताचा भारा घेऊन गावात विकायला आली होती. त्याच वेळेस तेथे असलेल्या लोकांनी म्हटले की “बाई आता तरी गवताचा भारा वाहन बंद कर’ कारण तुझा मुलगा साहेब झालाय!  हे ऐकताच त्या माऊलीच्या डोळ्यात खळकन पाणी आलं. मी केलेल्या कष्टाचं चीज झालं असे एक वाक्य तिच्या तोंडून बाहेर पडल. संतोषचे आज सर्वत्र कौतुक होत आहे एका छोट्याशा वाडीतला संतोष पोलीस उपनिरीक्षक झाल्याचा आनंद सर्वांना होताना दिसतो आहे. गरिबीवर मात करत, परिश्रमाची कास धरत आपण उत्तम यश मिळवू शकतो असे संतोष आवर्जून सांगतो आहे. संतोषला भविष्यात गावात वाचनालय व स्पर्धापरीक्षा केंद्र सुरू करण्याचा त्याचा मानस आहे. पुढील काळात त्याला पोलीस उपअधीक्षक व्हायची इच्छा आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here