महामंडळांच्या कामकाजाला महिन्याभरात मुहूर्त

घटक पक्षांना पदाधिकारी निवडीच्या सूचना

शरद पवार

राज्यातील रिक्त असलेल्या महामंडळांवरील नियुक्त्या करण्यासाठी महाविकास आघाडीतील नावांच्या निवड प्रक्रियेला लवकरच सुरुवात होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. कोणत्या पक्षाला कोणते महामंडळ द्यायचे हे याआधीच निश्चित झाले असून, या महिनाभरात महामंडळे कार्यान्वित करण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिल्या आहेत. काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीतही त्यांनी महामंडळांसाठी नावे मागवण्याच्या पक्ष पदाधिकार्‍यांना सूचना केल्या.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येऊन आठ महिन्यांचा काळ सरला आहे. पहिली दोन वर्षे वगळता राज्यात कोरोना संसर्गामुळे सारे काम ठप्प झाले होते. या संसर्गामुळे मंत्रालयातील उपस्थितीही रोडावली होती. कुठलेच काम होत नसल्याने एकीकडे विरोधी भाजपने सरकारवर टीकेची झोड उठवली असताना दुसरीकडे आघाडीतील घटक पक्षांमध्येही नैराश्याचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील अडखळलेल्या महामंडळांचे कामकाज सुरू करण्याला प्राधान्य देण्याची आवश्यकता शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गळी उतरवल्याचे सांगतात. या दोन नेत्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीत महामंडळांना मुहूर्त देऊन कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यावर एकमत झाल्याची माहिती मिळते. उद्धव ठाकरे यांनीही महामंडळांच्या नियुक्त्या करण्याला या बैठकीत सहमती दिली होती. यानंतर महामंडळांवरील पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्यांची चर्चा जोर धरू लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडलेल्या बैठकीत या नियुक्त्यांसाठी नावे सुचवण्याची सूचना करण्यात आल्या. आघाडीतील तिन्ही पक्षांना कोणते महामंडळ द्यावे याचा निर्णय सरकारने स्थापनेवेळीच घेण्यात आला होता. त्यानुसार महिनाभरात महामंडळांचे कामकाज सुरू करण्याला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे दिसते.