नांदले येथील खैरतोडीकडे अधिकार्‍यांची डोळेझाक

Mumbai

कधी काळी विपुल वनसंपत्ती असलेल्या रायगड जिल्ह्यात जंगलमाफियांनी संबंधित अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने उरली सुरली वनसंपदाही नष्ट करण्याचा विडा उचलला आहे की काय, अशी शंका येऊ लागली आहे. मुरुड तालुक्यातील नांदले परिसरात सध्या सुरू असलेल्या अवैध खैर लाकूड तोडीकडे वन व महसूल विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे त्याठिकाणी सध्या बेसुमार तोड सुरू आहे.

मुरुड तालुक्यातील आगरदंडा मंडळ महसूल क्षेत्रातील शेतकरी रवींद्र डोंगरीकर यांच्या मालकीमध्ये खैर वृक्षाची बेकायदेशीरपणे कत्तल सुरू आहे. याबाबत त्यांनी वन विभागाकडे तक्रार करून सुनील चव्हाण या व्यापार्‍यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र याकडे वन विभागाने दुर्लक्ष केलेले असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून ही वृक्षतोड सुरू आहे. तोडलेली लाकडे मुरुड-सावलीनमार्गे रोहे खाजणी गावाकडे रवाना करण्याचा उद्योग अनेक दिवस सुरू आहे. लाकडाच्या व्यापारातून लाखो रुपायांची उलाढाल होत असली तरी चोरीच्या मामल्यामुळे महसूल बुडत आहे. वाहतुकीसाठी संबंधित विभागाची बनावट परवानगी घेतली जाते. वाटेत त्याची वन किंवा पोलीस विभागाकडून साधी चौकशीसुद्धा होत नाही हे विशेष!

याबाबत थेट चव्हाण यांच्याकडेच विचारणा केली असता त्यांनी सदर तोड कायदेशीर आहे. डोंगरीकर यांनी दिलेला अर्ज वन अधिकार्‍यांनी निकालात काढला आहे, असे सांगितले. तर आपल्या नांदले येथील जागेत खैराची झाडे सुनील चव्हाण व मनोहर चव्हाण यांनी आपली संमती न घेता तोडली असल्याचा आरोप डोंगरीकर यांनी केला. या कामाला मदत करणारे वन अधिकारी, तसेच सुनील चव्हाण व मनोहर चव्हाण यांचावर कारवाई करण्याची मागणी आपण राज्याच्या वन मंत्र्यांकडे करणार असल्याचे ते म्हणाले.

नांदले येथील शेतकरी रवींद्र डोंगरीकर यांच्या जागेत समक्ष जाऊन पाहणी व पंचनामा करून झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे.
-प्रशांत पाटील, वन क्षेत्रपाल, मुरुड

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here