विखेंच्या संस्थेतील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी डॉ. अशोक विखे उपोषणावर ठाम

Mumbai
डॉ. अशोक विखे

प्रवरा, गणेश, राहुरी या साखर कारखान्यांची थकीत रक्कम द्यावी, देशद्रोही झाकीर नाईक यांनी प्रवरा मेडिकल ट्रस्टला दिलेल्या देणगीची सखोल चौकशी करण्यात यावी आदी विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे पाटील हे 20 मे रोजी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या पुतळ्यासमोर उपोषणास बसणार आहेत. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून उपोषण करू नये, अशी विनंती लोणी पोलिसांच्यावतीने त्यांना करण्यात आली आहे. परंतु, अशोक विखे पाटील हे उपोषणावर ठाम आहेत.

प्रवरा, गणेश, राहुरी या कारखान्याने जाहीर केलेला उसाचा भाव 2525 रुपये याप्रमाणे देण्यात आलेला नाही. हा भाव मिळावा म्हणून शेतकर्‍यांनी अनेकदा हेलपाटे घातले. ही रक्कम तातडीने देण्यात यावी, अशी मागणी डॉ.अशोक विखे यांनी केली आहे. बंदी घातलेल्या झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनने प्रवरा मेडिकल ट्रस्टला दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या डोनेशनची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

अहमदनगर जिल्हा परिषदेत भरण्यात आलेल्या अनुकंपाच्या 100 जागांचा गैरव्यवहार व त्याविषयी तपासणी समितीचाअहवाल जाहीर करून संबंधितांविरोधात कारवाई करण्याची मागणीही डॉ. विखे यांनी केली आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने 2004 ते 2009 मध्ये शालेय पोषण आहार यामध्ये मोठा भष्टाचार झाला असून त्याच्या चौकशीची मागणीही करण्यात आली आहे.

मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या 1400 कोटींच्या अपहाराची चौकशी, मुळा-प्रवरा वीज संस्थेला दरमहा सरकारकडून मिळालेली रक्कम ही सभासदांच्या नावे जमा करून सभासदांची थकबाकी कमी करणे या मागण्यांसाठी 20 मे 2019 रोजी लोणी बुद्रुक येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुतळ्यासमोर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे पाटील हे आमरण उपोषणास बसणार आहेत. सदरचे उपोषण करू नये, अशी विनंती लोणी पोलिसांनी केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here