‘भाजपकडून सत्तेचा गैरवापर’, IT विभागाच्या नोटिशीवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया!

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस आल्यानंतर त्यावर मोठा गहजब उडाला होता. त्यावर शरद पवारांना मोठा पाठिंबा देखील जनमानसातून मिळाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा आयकर विभाग राजकीय क्षेत्रामध्ये चर्चेत आला असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच आयकर विभागानं नोटीस पाठवली आहे. गेल्या १० वर्षांत त्यांनी जमवलेल्या संपत्तीच्या विवरणाची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली आहे. यावरून आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयात देखील कारकिर्द निभावली असल्यामुळे इतक्या ज्येष्ठ नेत्याला आयकर विभागाची नोटीस येणं चर्चेचा विषय ठरत आहे.

ऐन दिवाळीच्या काळातच पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागानं नोटीस पाठवली होती. आता स्वत: चव्हाण यांनीच ही माहिती दिली असून त्यावरून केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. ‘आयकर विभागानं नोटीशीमध्ये गेल्या १० वर्षांच्या विवरणाची मागणी केली आहे. त्यासोबतच येत्या २१ दिवसांत या नोटिशीला उत्तर द्यायला सांगण्यात आलं असून प्रत्यक्ष देखील हजर राहण्याचे निर्देश नोटिशीमध्ये देण्यात आले आहेत. त्या दृष्टीने आम्ही योग्य ती कार्यवाही करत आहोत. या नोटिशीला सविस्तर उत्तर दिलं जाईल’, असं चव्हाण म्हणाले आहेत. मात्र, त्यासोबतच त्यांनी भाजपवर निशाणा देखील साधला आहे.

‘आपल्याकडे असलेल्या सत्तेचा वापर कुणासाठी कसा करायचा याची भाजपची व्यूहरचना आहे. त्याच आधारावर हे सगळं घडत आहे. शरद पवारांना देखील अशीच नोटीस पाठवली होती, आता मलाही अशीच नोटीस पाठवली आहे’, असं चव्हाण यावेळी म्हणाले.