पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आयटीआयचे विद्यार्थी सरसावले

राज्याच्या विविध भागांतून 42 पथके रवाना

Mumbai
आयटीआयचे विद्यार्थी

कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पुरस्थितीमुळे राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पुरामुळे घरांचे मोठे नुकसान झाले असून, वीज, पाणी सेवा बंद झाली आहे. या सेवा सुरू करण्यासाठी राज्यातील आयटीआयच्या विद्यार्थ्यांची 42 पथके पूरग्रस्तांच्या मदतीला जाणार आहेत. यामध्ये इलेक्ट्रिशन, प्लंबर, वेल्डर, सुतार, गवंडी अशा विविध कोर्सच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

पुराच्या तडाख्यामुळे कोल्हापूर, सांगलीमधील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले. पुरामुळे लोकांच्या घरांचे, दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भिंती कोसळणे, खराब झालेल्या घरातील वस्तू, खंडित झालेला वीज पुरवठा, पाणी पुरवठा यामुळे नागरिकांना जगणे असह्य झाले आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यातील अनेक संस्था, संघटना पुढे आल्या आहेत. पाणी, वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि घरातील खराब झालेल्या वस्तू दुरुस्त करून पूरग्रस्तांचे जनजीवन सुरळीत करण्यासाठी आयटीआयमधील विद्यार्थ्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. पुरामुळे खंडित झालेली वीज आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तसेच कोसळलेल्या भिंती आण खराब झालेले फर्निचर दुरुस्त करण्यासाठी आयटीआयची 42 पथके राज्यातून पूरग्रस्त भागात जाणार आहे. सोमवारी पहिले पथक कोल्हापूरमध्ये दाखल झाले. त्यानंतर मंगळवारी तब्बल नऊ पथके मदतीसाठी कोल्हापूरात रवाना झाली आहेत.

उर्वरित पथके वाहतूक सुविधा सुरळीत होताच पूरग्रस्त भागात पोहचणार आहेत. हे विद्यार्थी महावितरणच्या कर्मचार्‍यांसोबत पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या घरातील वीज जोडणीची तर स्थानिक संस्थांच्या मदतीने पाणी जोडणीची कामे प्राधान्याने हाती घेणार आहेत. त्यानंतर पुढील टप्प्यामध्ये पूरग्रस्तांच्या घरातील सामानांची डागडुजी करण्याचे काम हाती घेणार आहेत. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील सांगाव येथे विद्यार्थ्यांच्या मदत पथकाने कामाला सुरुवात केली आहे, अशी माहिती आयटीआयचे उपसंचालक योगेश पाटील यांनी दिली.

असे असेल पथक
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाणार्‍या प्रत्येक पथकामध्ये एक शिक्षक व 12 ते 15 विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. यामध्ये इलेक्ट्रिशन, प्लंबर, सुतार, वेल्डिंग, फॅब्रिकेशन इत्यादी कामे करणारे द्वितीय वर्षाचे विद्यार्थी असणार आहेत.

कसे करणार काम
पूरग्रस्त जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांच्या मार्फत कोणत्या गावात विद्यार्थ्यांचे पथक पाठवायचे याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक गावात विद्यार्थ्यांचे पथक जाऊन महावितरणच्या कर्मचार्‍यांच्या साथीने इलेक्ट्रिकचे व नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांच्या साथीने प्लम्बिंगचे काम हाती घेणार आहेत.

राज्यातून जाणार्‍या पथकांची संख्या
विभाग -पथकांची संख्या
मुंबई -8
औरंगाबाद -8
नागपूर -3
अमरावती -3
नाशिक -9
पुणे -11