घरमहाराष्ट्रजायकवाडी 98 टक्के भरले; साडेतीन हजार क्युसेकचा विसर्ग सुरू

जायकवाडी 98 टक्के भरले; साडेतीन हजार क्युसेकचा विसर्ग सुरू

Subscribe

धरण 98 टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून विसर्ग करण्याचा निर्णय

विक्रम पासलकर : अस्वली स्टेशन
निम्म्या महाराष्ट्रासाठी वरदान असलेले औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी (नाथसागर) जलाशय अखेर तुडूंब भरल्याने या धरणातून शनिवारी 3685 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. धरण 98 टक्के भरले असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तेथील प्रशासनाने विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.

शनिवारी सायंकाळी 6 वाजता या धरणात 97.90 टक्के उपयुक्त साठा तयार झाला होता. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या जायकवाड़ी शंभर टक्के भरल्यातच जमा झाले आहे. यावेळी या धरणात मागील सहा तासातील पाण्याची सरासरी आवक 7460 क्युसेकने होत होती. नवीन पाण्याची आवक सातत्याने सुरू असल्याने शनिवारी दुपारी 12.30 वाजता एकूण 27 गेटपैकी नदी गेट क्रमांक 10 व 27 हे दोन्ही गेट अर्धा फुटांनी उचलून त्यातून विसर्ग सुरु करण्यात आला. या दोन्ही गेट मिळून 1048 क्युसेकने विसर्ग सुरु केला. त्यानंतर सायंकाळी 6.30 ते 7 या दरम्यान पुन्हा 18 व 19 क्रमांकाचे आणखी दोन गेट अर्ध्या फुटांनी वर उचलण्यात आले. त्यातुन ही 1048 क्युसेकने विसर्ग असा एकूण 2096 व परवा विद्युत प्रकल्पाच्या गेट मधुन 1589 सोडण्यात आलेले, असे एकूण 3685 क्युसेकने विसर्ग जायकवाडी जलाशयातुन गोदावरीत सोडण्यात येत आहे. या शिवाय जायकवाडीचा डावा कालवा 100, तर उजवा कालवा 500 क्युसेकने सुरु आहे. असे एकूण 4285 क्युसेकने पाणी जायकवाडी जलाशयाच्या बाहेर पडत आहे.

- Advertisement -

शनिवारी सायंकाळी जायकवाडी जलाशयात उपयुक्त साठा 75074 दलघफू म्हणजेच 75 टीएमसी इतका झाला होता. याची उपयुक्त साठ्याची क्षमता 76 टीएमसी इतकी आहे. तर मृतसह एकूण साठा 101144 दलघफू इतका होता. म्हणजेच 101 टीएमसी इतका साठा आहे. याची मृतसह एकूण साठ्याची क्षमता 102 टीएमसी इतकी आहे. 98 टक्क्यांवर पोहचल्यानंतर त्यातुन विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

दारणा धरणातून 1350, वालदेवीतून 241, कडवातून 424 क्युसेकने विसर्ग नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या दिशेने सुरु आहे. हे पाणी गोदवरीत पडत आहे. गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने 4035 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. भंडारदारतून 812 निळवंडेत तर निळवंडेतून ओझरच्या दिशेने 710 तर प्रवरेच्या ओझर वेअरमधून 1093 क्युसेकने विगर्स मिळत होता. तर मुळातून 2000 क्युसेकने विसर्ग सुरु होता. हे पाणी जायकवाडीच्या दिशेने प्रवाहित होत आहे. जायकवाडी व नदी मार्गातील पाऊस यामुळे काल सायंकाळी 6 वाजता जायकवाडीत 7460 क्युसेकने सरासरी आवक होत होती.

- Advertisement -

मराठवाड्यासह नगर, नाशिकही समाधानी!

जायकवाडी धरण 6 ऑगस्ट रोजी तांत्रिकदृष्ट्या शंभर टक्के भरले असून धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने पाणीसाठा 98 टक्केला मर्यादीत ठेवून नदीत 3685 क्युसेक्स, उजवा कालवा 500 क्युसेक्स आणि डावा कालवा 100 क्युसेक्स असे एकूण 4285 पाण्याचा विसर्ग चालू केला आहे. जायकवाडी धरण अलिकडील काळात सन 2018 वगळता (55 टक्के), सन 2017 ते 2020 पर्यंत शंभर टक्के भरलेले आहे. मागील वर्षीचे 27 टीएमसीचा जिवंत पाणीसाठा शिल्लक होता. जायकवाडी धरण सातत्याने भरत असल्याने मराठवाडा विभागात समाधान आहे. तसेच नगर नाशिक जिल्ह्यातही समन्यायी पाणी वाटपाच्या जोखडातून यावर्षीही मुक्ती मिळाल्याने समाधानाचे वातावरण आहे. यावर्षीही मागील वर्षाप्रमाणे जायकवाडीत पाणीसाठा शिल्लक राहुन पुढील वर्षही नगर नाशिकसाठी समाधानकारक राहील.

पाण्याची शाश्वती असल्याने नगर नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी रब्बी आणि उन्हाळ हंगामातील पिकाचे सुयोग्य नियोजन करावे. महत्त्वाचे म्हणजे या पाण्याचे जलसंपदा विभागाकडून सिंचन आवर्तनांचे योग्य वेळापत्रक, त्याअनुषंगाने वर्षभरासाठी काटेकोर व कार्यक्षम नियोजन होणे आवश्यक आहे. अन्यथा चुकीच्या नियोजनामुळे पाणी असुनही लाभधारकांना अपेक्षित लाभ मिळणार नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी, लाभधारक, जलसंपदा विभाग यांच्या यथायोग्य समन्वयातून प्रभावी सिंचन व्यवस्थापन व्हावे ही अपेक्षा आहे.
– उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -