घरमहाराष्ट्र...तरच भाजपला बारामती जिंकता येईल; जयंत पाटील यांनी सांगितला फॉर्म्युला

…तरच भाजपला बारामती जिंकता येईल; जयंत पाटील यांनी सांगितला फॉर्म्युला

Subscribe

मी बारामतीमध्ये माझे स्किल दाखवू शकतो, या गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटील यांनी बारामती जिंकण्याचा फॉर्म्युलाच सांगितला आहे.

“आम्ही मुलंच नाही तर नातूही पळवू शकतो आणि पक्षाने जबाबदारी दिली तर मी बारामतीमध्ये माझे स्किल दाखवू शकतो”, असे वक्तव्य भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. या वक्तव्याचा चांगलाच समाचार आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी घेतला. ते म्हणाले की, “भाजप आणि त्यांच्या नेत्यांचा इतर पक्षातील कार्यकर्ते पळवा-पळवी करणे हाच धंदा आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा झालाच तरच ते बारामती जिंकू शकतात. त्यामुळे ईव्हीएमचे स्किल दाखवले तरच ते शक्य होईल. लोकांच्या बळावर हे शक्य नाही. मागील अनेक वर्षांपासून पवार साहेबांच्या पाठिशी तिथली जनता उभी राहिली आहे”, असे वक्तव्य करत पाटील यांनी महाजन यांना चांगलाच टोला हाणला.

बारामती मतदारसंघ हा शरद पवार यांच्यामुळ राज्यातील महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. प्रत्येक निवडणुकीत विरोधकांकडून बारामती जिंकण्याची भाषा केली जाते. यावेळी देखील मुख्यमंत्र्यांनी बारामतीसहीत ४३ जागा जिंकू असे सांगितले होते. २०१४ निवडणुकीत भाजपने महादेव जानकर यांना तिकीट देऊन खासदार सुप्रिया सुळे यांना चांगलीच लढत दिली होती. त्यामुळे यावेळी भाजपकडून वारंवार बारामती जिंकण्याची भाषा केली जात आहे. भाजपच्या या मनसुब्यावर जयंत पाटील यांनी चांगलेच तोंडसुख घेतले.

- Advertisement -

उद्या पहिली यादी जाहीर होणार

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील निवासस्थानी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीबाबत जयंत पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली. “राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास सर्वच उमेदवारांची यादी निश्चित झाली आहे. उद्या काही नावे जाहीर केली जातील. तसेच त्यानंतर दोन दिवसांनी दुसरी यादी जाहीर केली जाईल. आजच्या बैठकीत दक्षिण अहमदनगर येथील पदाधिकाऱ्यांची मत आजमावली आहे. लवकरच निर्णय घेतले जातील.”, असे पाटील म्हणाले. राजू शेट्टी यांनी सर्वात आधी भूमिका घेतली की हे सरकार शेतकरी विरोधी आहे. ही भूमिका फार जुनी आहे. त्यामुळे राजू शेट्टी भाजपसोबत जाणार या वावड्या उठवणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.

सुजय विखे यांच्या भाजपप्रवेशाबाबत प्रश्न विचारला असता पाटील म्हणाले की हा प्रश्न भाजपलाच विचारला पाहिजे. विखे पाटील यांनी विरोधक म्हणून भाजपवर सडकून टीका केली. त्यांच्या विरोधात कविता केल्या. आता भाजप त्यांच्याच पुत्राला पक्षात घेत आहे. भाजप कोणालाही पक्षात घेतं क ? त्यांना सगळे कसे चालतात? निवडणूक जिंकण्यासाठी साम दाम दंड हे सर्व तत्वे वापरली जात असल्याची टीका पाटील यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -