घरमहाराष्ट्रकोरोनाच्या काळात राज्यात नोकरीच्या जम्बो संधी

कोरोनाच्या काळात राज्यात नोकरीच्या जम्बो संधी

Subscribe

पोलीस दलात १० हजार शिपाईपदांची भरती

राज्यात कोरोनामुळे नोकरी आणि रोजगाराच्या संधी कमी होत असताना उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात आगामी काळात पोलीस दलात १० हजार पोलीस शिपाई जागांची भरती करण्यात येणार आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात 10 हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात मंगळवारी महत्त्वाची बैठक झाली. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवास, एसआरपीएफच्या अपर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

बैठकीत गृह विभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या ८ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी २ हजार जागा वाढवून एकूण १० हजार पोलीस शिपाई भरती करण्याचे व ही भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल, याचा विचार करून सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मंत्रिमंडळ मंजुरीनंतर भरती प्रक्रियेची कार्यवाही वेग घेईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

राज्यात १० हजार पोलीस शिपायांची भरती करण्याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याच्या निर्णयावरही आज उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या बटालियनसाठी १३८४ पदे निर्माण करण्यात येणार असून, प्रत्येक टप्प्यात ४६१ प्रमाणे ३ टप्प्यात ही पदे भरण्यात येणार आहेत. यातूनही शहरी व ग्रामीण युवतींना पोलीस सेवेची संधी मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

- Advertisement -

राज्यातील सण, उत्सव, सामाजिक-राजकीय मोर्चांमध्ये महिलांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे. उपराजधानी नागपूरची भौगोलिक स्थिती, रेल्वे, विमान व दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता लक्षात घेवून एसआरपीएफच्या या केंद्रासाठी नागपूर जिल्ह्याची शिफारस करण्यात आली होती. त्याअनुषंगाने काटोल गावच्या हद्दीत शासकीय जमीन उपलब्ध असल्याने त्याठिकाणी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे.

मेट्रो रेलसाठी ११० पदांसाठी भरती

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने मुंबई मेट्रोसाठी विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवारांना या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आता वेबसाईटवर संधी देण्यात आली आहे. एमएमआरडीएची वेबसाईट mmrda.maharashtra.gov.in या वेबसाईटवर एकूण ११० पदांसाठीची जाहिरात एमएमआरडीएमार्फत याआधीच जारी करण्यात आली आहे.

एमएमआरडीएने टेक्निशिअन, ट्रेन ऑपरेटर, ज्युनियर इंजिनिअर, ट्रॅफिक कंट्रोलर आणि हेल्पर अशा विविध पदाअंतर्गत ही भरती प्रक्रिया सुरू केली आहे. किमान १५ हजारांपासून ते कमाल १ लाख २३ हजार रुपये इतका पगार या विविध पदांसाठी देण्यात येणार आहे. सर्वाधिक अशी ५३ पदे टेक्निशिअन या श्रेणीअंतर्गत भरण्यात येणार आहेत. एकूण पदांमध्ये ट्रेन ऑपरेटर (१), ट्रॅफिक कंट्रोल (१), ज्युनिअर इंजिअर (स्टोर) (१) आणि हेल्पर (१) अशा पदांसाठी ही भरती आहे, तर उर्वरित पदे टेक्निशिअन वर्गवारीत विविध अभियांत्रिकी शाखे अंतर्गत असणार आहेत.

त्यामध्ये सर्वाधिक पगार हा ट्रॅफिक कंट्रोलर आणि ज्युनिअर इंजिनिअर या पदासाठी १ लाख २२ हजार ८०० रुपये इतका देण्यात आला आहे, तर सर्वात कमी पगार हा हेल्पर या पदासाठी ४७ हजार ६०० रुपये इतका देण्यात आला आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. अर्ज करण्यासाठीची सुरुवात २७ जूनपासून ते २७ जुलैपर्यंत आहे, तर एमएमआरडीएच्या संकेतस्थळावर यासाठीची पात्रता व अटींबाबतची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -