हायकोर्टाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांचा राजीनामा

Mumbai
न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी

मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती सत्यरंजन चंद्रेशखर धर्माधिकारी यांनी न्यायामूर्ती पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्राबाहेरच्या हायकोर्टात मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली होण्याच्या शक्यतेमुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र कौटुंबिक कारणामुळे महाराष्ट्राबाहेर जाणे शक्य नसल्यामुळे मी न्यायमूर्ती पदाचा राजीनामा दिला, असे धर्माधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

सत्यरंजन धर्माधिकारी हे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांच्यानंतरचे मुंबई हायकोर्टातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. मागील १६ वर्षांपासून ते मुंबई हायकोर्टात कार्यरत आहेत. मुख्य न्या. नंदराजोग हे २४ फेब्रुवारीला सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी मुख्य न्यायमूर्ती म्हणून बढती मिळावी, अशी धर्माधिकारी यांची अपेक्षा असल्याची चर्चा होती. मात्र, मुंबई ऐवजी अन्य ठिकाणी मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली केली जाणार असल्याचे संकेत त्यांना मिळाले होते.

त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. धर्माधिकारी यांनी गुरुवारी संध्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. अन्य एखाद्या राज्यात मुख्य न्यायमूर्ती म्हणून बढतीवर बदली होणार असली तरी मला माझ्या वैयक्तिक/कौटुंबिक कारणामुळे महाराष्ट्राबाहेर जाणे शक्य नव्हते. म्हणून मी न्यायमूर्ती पदाचा राजीनामा दिला,’ अशी माहिती धर्माधिकारी यांनी दिली आहे.