राज्यपालांच्या भेटीनंतर कंगनाच्या हातात ‘कमळ’, चर्चांना उधाण

bollywood actress kangana ranaut new challenge
तर माफी मागेन आणि ट्विटरही सोडेन, कंगनाचं आव्हान

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने रविवारी संध्याकाळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना कंगनाने राज्यपालांचे आभार मानले. “माझे राजकारणाशी काही देणेघेणे नाही. माझ्यासोबत चुकीचा व्यवहार झाला. मी मुलगी असल्याप्रमाणे राज्यपालांनी माझे म्हणणे ऐकून घेतले. मला विश्वास आहे की, मला न्याय मिळेल.”, अशी प्रतिक्रिया तिने दिली. यावेळी कंगनाच्या हातात असलेल्या कमळाच्या फुलांनी मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

कंगना विरुद्ध शिवसेना या पुर्ण घटनाक्रमात कंगना राणावत ही भाजपच्या बाजूने झुकलेली पाहायला मिळाली. याआधी देखील कंगना राणावत यांच्या आईने भाजपचे आभार मानले होते. आम्ही मुळ काँग्रेसी होतो, मात्र आता आम्हाला भाजप जवळची वाटत असल्याचे तिच्या आईने सांगितले होते. आज जेव्हा कंगना राणावत राज्यपालांना भेटून बाहेर पडली तेव्हा तिच्या हातात दोन कमळाची फुले पाहायला मिळाली. हे पाहिल्यानंतर कंगना लवकरच भाजपचे अधिकृत चिन्ह असलेले कमळ देखील हातात घेईल, असा कयास बांधला जात आहे.

शिवसेनेसोबत पंगा घेतल्यानंतर लगेचच केंद्रीय गृहमंत्रालयाने ताबडतोब कंगनाला वाय श्रेणीची सुरक्षा पुरवली होती. बॉलिवूडमध्ये अशा श्रेणीची सुरक्षा मिळवणारी कंगना ही पहिलीच कलाकार आहे. तसेच या प्रकरणात हिमाचल प्रदेशचे भाजप प्रणीत सरकार कंगनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपकडून कंगना उघड समर्थन मिळत असल्याचे चित्र दिसले.

हे वाचा – ‘मी ड्रग्ज Adict होते’, कंगनाचा तो व्हिडिओ होतोय व्हायरल

यासोबतच भाजपचे घटक असलेले रिपाईंचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी कंगना राणावतची भेट घेतली होती. मुंबई महानगरपालिकेने कंगनाचे कार्यालय पाडल्याबद्दल तिला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच जर कंगना भाजपात प्रवेश करत असेल तर तिला राज्यसभेची खासदारकी मिळू शकते, असेही आठवले यांनी सूचित केले होते.