रेल्वे,रस्ते वाहतूक विस्कळीत कसारा घाटात कोसळली दरड

Mumbai

कसारा घाट परिसरातील रेल्वे आणि रस्ते मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे आणि रस्ताही काही काळाकरता बंद करण्यात आला होता. गुरुवारी सकाळच्या सुमारास रेल्वे मार्गावरील हिवाळाब्रीज टिजीआर थ्री आणि टू दरम्यान डाउन मार्गावर किमी 130/8 येथे रेल्वे रुळावर दरड कोसळून रेल्वे वाहतूक बंद झाली. याच दरम्यान मुंबई-नाशिक महामार्ग क्रमांक तीनच्या नाशिक आणि मुंबई लेन मार्गावर झाड आणि दरड कोसळल्याने रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली होती. दोन्ही मार्गावरील दरड हटवण्याचे काम दुपारपर्यंत सुरू होते. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

तीन दिवसांपासून रात्रभर संततधार कोसळणार्‍या पावसामुळे मध्य रेल्वेच्या मार्गावर असलेल्या मुंबई-नाशिक मार्गावर दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणावर रेल्वे रुळावर दगडधोंडे आणि माती जमा झाली होती. यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गिकेवरून वळवण्यात आल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले. हा प्रकार घडताच काही काळ कल्याण-कसारा मार्गावरील नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करून रेल्वे ट्रॅकवर जमलेला माती-दगडांचा ढीग बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास वाहतूक पूर्ववत करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक तीनवर सकाळी सहाच्या सुमारास दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी कसारा पोलिसांनी इतर लोकांच्या मदतीने रस्त्यावर आलेले दगड माती बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.