घरमहाराष्ट्रकेडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना अटक

केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना अटक

Subscribe

मागितली ४२ लाखांची लाच

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे वादग्रस्त अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना आठ लाखांची लाच घेताना ठाणे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. घरत यांच्यासह लिपीक ललित आमरे, भूषण पाटील या दोघांना अटक केली. सात मजली अनधिकृत इमारतीवर कोणतीही कारवाई करू नये, यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी तक्रारदाराकडे ४२ लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोडअंती ३५ लाख देण्याचे मान्य करण्यात आले. लाचेचा पहिला हप्ता आठ लाख रूपये बुधवारी देण्याचे ठरले होते. त्यानुसार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या कार्यालयाबाहेर सापळा लावला होता. तक्रारदार यांच्याकडून हा पहिला हप्ता स्वीकारताना घरत यांना पकडण्यात आले. घरत यांना एसीबीने पकडल्याची बातमी पसरताच पालिकेत नागरिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या आवारातील घरत यांच्या इनोव्हा गाडीची तसेच अन्य एका खाजगी गाडीची देखील कसून झडती घेतली. दरम्यान, घरत यांच्या निवासस्थानी तपासासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एक पथक रवाना झाले. याप्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दीपक दळवी हे करीत आहेत.

- Advertisement -

घरतांचा रूबाब संपला !
महापालिकेतील एक वजनदार व ऐटबाज अधिकारी म्हणूनच त्यांची ओळख होती. आयुक्तांपेक्षा घरत यांचा रूबाब प्रशासनात अधिक होता. पालिकेतील अधिकारी आणि पत्रकारांना ते तासनतास केबीनच्या बाहेर उभे करून ठेवत असत. त्यामुळे पालिकेतील कर्मचारी व अधिकारी व पत्रकारांमध्ये त्यांच्याविषयी नाराजीचा सूर होता. मात्र घरत हे एसीबीच्या जाळयात अडकल्याने सर्वांनीच आनंद व्यक्त केला. काहींनी तर पालिकेच्या बाहेर पेढेही वाटले. घरतांचा रूबाब संपल्याचीच चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती.

कारर्किद वादग्रस्त, घोटाळ्यांचे आरोप …
घरत हे नेहमीच कोणत्यातरी कारणाने वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात आदर्श आचारसंहितेचा भंग करून स्थायी समितीची सभा घेण्यात आली. या सभेत ९ कोटींच्या कामांसह बायोमेडिकल वेस्टचा प्रस्ताव घाईगडबडीत मंजूर केल्याचा ठपका ठेवत घरत यांच्यासह १० अधिकाऱ्यांवर पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली होती. घरत हे परिवहन उपव्यवस्थापक पदी असताना केडीएमटीतील तिकीट, इंजीन, डिझेल-फिल्टर यांच्या घोटाळ्यांचे आरोप त्यांच्यावर आहेत. तसेच महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात गैरवर्तन करणे, त्याचबरोबर मतदार याद्या बनवण्यात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा करणे, मतदान केंद्रे निश्चित करण्यास दिरंगाई असे ठपके त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. दरवर्षी सादर केल्या जाणाऱ्या मालमत्ता व विवरण पत्रात पत्नीच्या नावे असलेली मालमत्ता नमूद न करता ती दडवल्याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सखोल चौकशी चालू आहे.

- Advertisement -

ठराव होऊनही निलंबनाची कारवाई नाही
बेकायदा बांधकामप्रकरणी महासभेत विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी अतिरिक्त आयुक्त संजय घरत, उपायुक्त सुरेश पवार यांना निलंबीत करण्याचा ठराव करण्यात आला. मात्र घरत यांनी हा अशासकीय ठराव असून महासभेला त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले होते. तर घरत हे महापालिकेचे स्थानिक अधिकारी आहेत असे पत्र नगरविकास खात्याचे अवर सचिव नवनाथ वाठ यांनी विरोधी पक्ष नेते हळबे यांना पाठविले होते. मात्र तरीसुध्दा घरतांवर कोणतीच कारवाई झाली नव्हती.

घरतांचे होते मंत्रालय कनेक्शन
अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांचे मंत्रालयापर्यंत अनेक मंत्र्यांशी व सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी कनेक्शन असल्याची खमंग चर्चा नेहमी महापालिका वर्तुळात चर्चिली जायची. आमदार असतानाही आणि नंतर राज्यमंत्री झाल्यानंतरही रविंद्र चव्हाण हे त्यांच्या दालनात तासनतास बसलेले असायचे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही त्यांची जवळीक होती. पालिकेतील नगरसेवकांना अथवा कोणत्याही राजकीय पदाधिकारीने त्यांच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर त्या पदाधिकाऱ्यांवर वरिष्ठ पातळीवरून दबाव आणून बसविण्याची किमया ते करीत.

पेढे वाटून आनंद व्यक्त
डोंबिवली शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी कल्पेश जोशी नावाचा तरुण गळयात पाटी अडकवून गेल्या चौदा दिवसांपासून महापालिकेसमोर निषेध आंदोलन करीत आहे. मात्र प्रशासनाकडून अजूनही दखल घेण्यात आलेली नाही. घरत यांना लाच घेताना पकडल्याची बातमी कळताच जोशी याने प्रवेशद्वारासमोर पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -