खडसेंनी टाळली फडणवीसांची भेट

राजकिय वातावरण तापले : जामनेरात भाजप आमदारांची महत्वपूर्ण बैठक संपन्न

Eknath-Khadse-Devendra-Fadnavis
खडसेंचा फडणवीसांना टोला

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत थेट नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. एकूणच या सर्व राजकिय घडमोडींच्या पार्श्वभुमीवर मंगळवारी जामनेर येथे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित हॉस्पिटलच्या

लोकार्पण सोहळयाला खडसे उपस्थित राहणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते परंतू खडसे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत फडणवीसांची भेट टाळली यावरूनच खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जात आहे.
खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या घडामोडीत गेल्या चार दिवसांपासून खडसे हे मुंबई येथे होते. यादरम्यान ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगली. त्यामुळे मंगळवारी जामनेर येथे फडणवीस यांना एकनाथ खडसे हे भाजपचे नेते म्हणून भेटतील की तोपर्यंत राष्ट्रवादीमध्ये जातील, याबाबत चर्चा सुरू होत्या. नेमके याच काळात जामनेर येथे गिरीश महाजनांच्या पुढाकाराने उभारलेल्या ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटलचे लोकार्पण आज मंगळवारी फडणवीस यांच्या हस्ते होत असल्याने गिरिश महाजनांनी त्यासाठी खडसेंनाही निमंत्रण दिले होते, त्यामुळे त्याठिकाणी खडसे- फडणवीस भेटीबाबत उत्सुकता लागून होती. मात्र, खडसे यांनी मंगळवारी दुपारीच जामनेरला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. खडसे प्रत्यक्ष गेले नसले तरी त्यांनी महाजनांना फोन करुन या प्रकल्पाबाबत शुभेच्छा दिल्या. हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील जनतेसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाजनांच्या घरी गुप्त बैठक
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणारा हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपमध्ये खळबळ उडाली. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगावाच्या दौर्‍यावर आले असता या दरम्यान गिरीश महाजन यांच्या घरी काही निवडक आमदारांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. यावेळी खडसे यांच्यासोबत कोण जाऊ शकते याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आल्याचे समजते.

खडसे समर्थकांचे ‘सोशल वॉर’
जामनेरमध्ये देवेंद्र फडणवीस दाखल झाल्यानंतर खडसे समर्थक आक्रमक झाले आहे. खडसे समर्थकांनी सोशल मीडियावर एकनाथ खडसे यांचा फोटो व्हायरल करत ’आमचा नेता आमचा अभिमान’ अशाप्रकारे एकनाथ खडसे यांना समर्थन दर्शवले आहे. त्यामुळे जळगावात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेष म्हणजे, एकनाथ खडसे हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज होते. अलीकडे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निवड न झाल्यामुळे खडसे कमालीचे दुखावले गेले होते. त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. परंतु, एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाबद्दल वृत फेटाळले होते. मात्र, आता एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जात आहे. लवकरच खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबद्दल अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

खडसे आमचे नेते : फडणवीस
गिरीश महाजन यांच्या निवासस्थानावर काही निवडक आमदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना फडणवीस म्हणाले, ’एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे. राजकारण कसे आहे, त्यांना चांगले माहिती आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे’ अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. तसेच, ’एकनाथ खडसे यांच्यासोबत आज कोणतीही चर्चा झाली नाही. योग्यवेळी मी चर्चा करेल आणि मला पूर्ण विश्वास आहे की, खडसे हे योग्य निर्णय घेतील’ असेही फडणवीस म्हणाले.