‘नानासाहेब फडणवीस बारभाई कारस्थान’

खडसे अन्यायाविरोधात लिहिणार पुस्तक

भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. मागे पुढे मुख्यमंत्रीपदाच्या वाटेत आपण उभे राहू, या भीतीमुळे आपला काटा काढण्यात आला. आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठरवून करण्यात आले. यातून काही सिध्द झाले नाही. मात्र असे असूनही माझ्यावर दाऊदला भेटण्याचा आरोप करणार्‍या हॅकर मनीष भंगाळेला मध्यरात्री फडणवीस का भेटले? मी तसे त्यांना विचारलेही. पण, तो मला भेटायला आला होता, मी भेटलो, असे मोघम उत्तर त्यांनी दिले. एकूणच हे सर्व ठरवून केलेले कारस्थान होते आणि यावर आपण लौकरच ‘नानासाहेब फडणवीस बारभाई कारस्थान’ नावाचे पुस्तक लिहिणार असल्याचे खडसे यांनी जाहीर केले.

खडसे यांनी याच आठवड्यात आपल्या वाढदिवसावेळी फडणवीस यांना लक्ष्य करताना अलीकडे उदयाला आलेले नेते चमकायला लागले आहेत, अशी टीका केली होती. शनिवारी पुन्हा एकदा खडसे यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले असते; पण ओबीसी, बहुजन यांच्यावर अन्याय करत त्यांची तिकिटे कापण्यात आली. जे आडवे आले, त्यांना विधानसभा निवडणुकीत पूर्ण आडवे करण्याचे काम आमच्या नेत्याने केले. माझे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांचे तिकीट कापले. माझी मुलगी, पंकजा मुंडे यांना हरवण्याचे प्रयत्न झाले. याचे मी पक्षश्रेष्ठीना पुरावे दिले; पण, त्याचा काही फायदा झाला नाही. याकडे खडसे यांनी लक्ष वेधले.

भंगाळे, दमानिया माझ्यावर जोरदार आरोप करत होते. हे आरोप आठवडाभर सतत प्रसार माध्यमांमध्ये चर्चेत राहतील याची व्यवस्था करण्यात आली. माझी चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्ती झोटिंग यांची समिती नियुक्त करण्यात आली. पण यामधून काही निष्पन्न झाले नाही, पण माझी कारकीर्द उद्ध्वस्त करण्यात संबंधित यशस्वी झाले. हा सारा अनुभव आपण पुस्तकात मांडणार आहोत, असे खडसे म्हणाले.

आपला मुद्दा आक्रमकपणे मांडत खडसे म्हणतात, मी चार दशके भाजपमध्ये असून दहा पंधरा वर्षांपूर्वी पक्षात आलेले नेते आता आपल्याला अक्कल शिकवायला लागले आहेत. पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये असून त्याचा कधीही स्फोट होऊ शकतो.

फडणवीस अजित पवारांविरोधात का बोलत नाही?
यावेळी खडसे यांनी एक नवीन मुद्दा उपस्थित केला. ‘फडणवीस राज्यभर दौरे करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांवर टीका करत असतात. मात्र ते कधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात बोलत नाही. असे का? असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला.