निःशुल्क गणेश विसर्जन करणाऱ्या तरुणांचा विमा काढला

Mumbai
khar danda ganesh mandal youth did free ganesh visarjan
मूर्ती विसर्जन करताना नितीन पोरे आणि तरुण सहकारी कार्यकर्ते.

दहा दिवस श्री गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर भाविक जड अंतकरणाने बाप्पाचे विसर्जन करत असतात. मात्र विसर्जनाच्यावेळी अनेकदा दुर्घटना घडण्याच्या घटना मुंबईत घडत असतात. दुर्घटनेचे हे विघ्न टाळण्यासाठी खारदांड्यातील दोन गणेश मंडळे गेल्या अनेक वर्षांपासून घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशमुर्तीचे निःशुल्क विसर्जन करत आहेत. श्री राम विसर्जन मंडळ कोटपाडा आणि श्री गणेश विसर्जन मंडळ वारीनपाडा अशी या दोन गणेश मंडळाची नावे आहेत. या विभागातील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद खैरे हे विसर्जन करणाऱ्या तरुणांचा विमा काढतात. स्वतःचा जीव धोक्यात घालून बाप्पांचे विसर्जन करणाऱ्या तरुणांचा गेल्या दहा वर्षांपासून खैरे विमा काढत आहेत. यावर्षी त्यांनी ७८ तरुणांचा विमा काढला आहे.

मिलिंद खैरे यांनी सांगितले की, ओरिएंटल इन्श्युरन्स कंपनीचे प्रशासकीय अधिकारी सचिन खानविलकर आणि जागृत प्रहार मंचचे अध्यक्ष्य सत्यनारायण निर्मल यांचे या उपक्रमात मोलाचे सहकार्य मिळते. विसर्जनासाठी येणारे भाविक समुद्राच्या तटावर मुर्ती सोडतात त्यामुळे विसर्जनानंतर मुर्त्यांचे भग्नावशेष पाहता येत नाही. काही भाविक स्वतः त्या खोल समुद्रात जाऊन विसर्जनाचा प्रयत्न करतात. अशावेळी आमच्या मंडळाच्या कार्यकर्ते स्वतःहून गणेश विसर्जनाजी जबाबदारी उचलतात. हे काम त्यांना बिनदिक्कत आणि निर्धास्तपणे करता यावे, यासाठी मी त्यांचा विमा काढण्याच निर्णय घेतला, असे खैरे म्हणाले.

दुर्घटना टाळण्यासाठी खारदांड्यातील तरुणांकडून निःशुल्क गणेश विसर्जन

खारदांड्यातील या दोन मंडळाचे कार्यकर्ते हे गणेशोत्सव काळात सर्व विसर्जनाच्या दिवशी खोल समुद्रात जाऊन श्रीगणेशाचे विसर्जन करतात. जर गणेश भक्तांनी स्वतः विसर्जन केले तर त्यांच्यासोबत दुर्घटना घडण्याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे स्थानिक तरुण हे अनुभवी आणि त्यांना समुद्राची माहिती असल्यामुळे ते स्वइच्छेने हे काम करतायत.