घरमहाराष्ट्रयाला म्हणतात दणका; शाळांना सुरक्षेचे उपाय पाळण्याचे आदेश!

याला म्हणतात दणका; शाळांना सुरक्षेचे उपाय पाळण्याचे आदेश!

Subscribe

खेडमध्ये भैरवनाथ विद्यालयात शालेय पोषण आहाराचे जेवण बनवताना सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. यासंदर्भात 'माय महानगर'ने वृत्त दिल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने या शाळांना सुरक्षेच्या उपाययोजना पाळण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत.

शालेय पोषण आहार योजनेसाठी शाळेत मध्यान्न भोजन बनवताना सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी खेडमध्ये घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसली, तरी त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या चिमुरड्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘माय महानगर’ने सविस्तर वृत्तांत दिल्यानंतर शालेय शिक्षण विभागाला खडबडून जाग आली असून लागलीच गटशिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शाळांना सुरक्षेच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे किमान आता तरी मुलांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

खेड जिल्ह्यातील किवळे गावातल्या श्री भैरवनाथ विद्यालयामध्ये गुरुवारी सकाळच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. यावेळी मुलांना दुपारचा पोषण आहार बनवण्याची तयारी सुरू असताना ही दुर्घटना घडली. सिलेंडर आणि गॅस शेगडी यांच्यातलं अंतर कमी ठेवल्यामुळेच हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे स्थानिक पातळीवर अशा शाळांमध्ये जेवण शिजवताना घेतली जाणारी काळजी हा मोठा मुद्दा बनला होता. यासंदर्भात ‘माय महानगर’ने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करणारं वृत्त दिल्यानंतर शिक्षण विभागाला जाग आली आहे. त्याअनुषंगाने शिक्षण विभागाने जिल्हा परिषद आणि राज्य सरकारच्या सर्व शाळांना सुरक्षेची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

काय म्हणाले शिक्षण विभाग?

यासंदर्भात गटशिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना निर्देश देणारे पत्र पाठवले आहे. यामध्ये नमूद केल्यानुसार…

किवळेमधील भैरवनाथ विद्यालय या शाळेत गॅस लिकेज होऊन स्फोट झाला असून तेथील शेडच्या पत्र्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही. परंतु, अशा घटना घडणे हे अतिशय निष्काळजीपणा आणि मुलांच्या सुरक्षिततेची काळजी नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या घटनेपासून बोध घेऊन सर्व मुख्याध्यापकांनी काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करावी.

 

- Advertisement -

शाळांनी काय काळजी घ्यावी?

१. किचन शेड शाळेपासून पुरेशा अंतरावर असावे

२. ज्या ठिकाणी धान्य ठेवतो ती जागा स्वच्छ असावी आणि वारंवार त्याची तपासणी करावी. धान्य खराब होणार नाही याची काळजी घ्यावी

३. गॅस चालू करताना त्यातून वास येत नाही याची खात्री करावी. गॅस वितरण कंपनीकडून पाईपची तपासणी करून घ्यावी. स्वयंपाक संपल्यानंतर आठवणीने गॅस बंद करावा

४. बचत गटांकडून ही सर्व कामे योग्य रीतीने होतात की नाही याबाबत शाळा स्तरावरून परीक्षण करावे

५. शाळेतील अग्निशमन यंत्र अद्ययावत करून घ्यावे आणि ते वापराबाबत प्रशिक्षण सर्वांना द्यावे

६. स्वयंपाक घराच्या आजूबाजूचा परिसर आणि पाणी यांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी

दरम्यान, दिलेल्या उपाययोजना त्वरीत अंमलात न आणल्यास आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -