चाकरमान्यांसाठी खुशखबर,पण…

कोकणकन्या-मांडवी होणार २४ डब्यांची

Mumbai
Modified kokankanya and mandovi express
कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेस

मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून चालविण्यात येणार्‍या मांडवी आणि कोकणकन्या एक्स्प्रेस १ सप्टेंबरपासून २४ डब्यांची करण्यात येणार आहे. त्यामुळे एकीकडे मांडवी आणि कोकणकन्या एक्स्प्रेसने जाणार्‍या कोकणातील चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. कोकण कन्या आणि मांडवी एक्स्प्रेसला 4 जनरल डब्बे जोडणार असले तरी ‘एका हाताने द्यायचे आणि दुसर्‍या हाताने घ्यायचे” या उक्तीप्रमाणे स्लीपर कोचचे मात्र दोन डब्बे कमी होणार आहेत. त्यामुळे प्रवासी संभ्रमात आहेत.

कोकणात जाण्यासाठी मांडवी आणि कोकणकन्या एक्स्प्रेस या दोन गाड्यांना मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते. त्यामुळे या मेल, एक्स्प्रेसमध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांना हालअपेष्टा सहन करत लांबचा प्रवास करावा लागतो. मांडवी आणि कोकणकन्या एक्स्प्रेसची गर्दी कमी करण्यासाठी या दोन्ही गाड्या २४ डब्यांची करण्याची मागणी कोकणात जाणार्‍या प्रवाशांनी केली होती. ही मागणी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मांडवी आणि कोकणकन्या एक्स्प्रेस २४ डब्यांची करण्याच्या निर्णय घेतला आहेत. सीएसएमटी ते मडगाव चालविण्यात येणारी मांडवी आणि कोकणकन्या एक्स्प्रेसची आता संरचना २0 प्रवासी डबे आणि एक पँट्री आणि एक जनरेटर डबा अशी आहे. यामध्ये प्रवासी डब्यांची संख्या वाढविण्यात यावी, एकूण २४ प्रवासी डबे असावेत, अशी मागणी मागील कित्येक दिवसांपासून प्रवासी संघटनाकडून करण्यात येत होती.

यासाठी कोकण रेल्वेच्या अधिकर्‍यांनी बैठक घेतली होती.त्यानंतर कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसच्या डब्यांची वाढ करण्यात येणार असल्याचे आश्वासन कोकण रेल्वे अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे, असे कोकण रेल्वे जागृत संघाचे सचिव विलास पावसकर यांनी सांगितले. सोबतच वांद्रे, बोरीवली, पनवेल मार्गे मडगाव कायमस्वरूपी गाडी सुरू करण्यात यावी, यासाठी येत्या काही दिवसांत रेल्वे मंत्री पीयूष गोयल व मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेच्या अधिकार्‍यांशी बैठक घेतली जाणार असल्याचे संघाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

स्लिपरचे दोन डबे कमी होणार

कोकण रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात 1 सप्टेंबर पासून 2 जनरल डब्यांऐवजी 4 जनरल असतील आणि स्लीपरचे 11 डब्या ऐवजी 9 डबे असतील, असे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत काहींनी कोकण रेल्वेच्या अधिकार्‍यांबरोबर बैठका घेऊन,त्या बैठकीत कोकण कन्या व मांडवीच्या दोन जनरल डब्यांऐवजी चार जनरल डब्बे करण्याच्या निर्णय झाला. असे सांगत स्वतःची पाठ थोपटून घेतली पण स्लिपरचे दोन कमी डबे झाले या कडे मात्र कानाडोळा केला गेला आहे. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.