कोल्हापूर जिल्हा कोर्टात ७५ कुटुंबांना आसरा

३०० जणांच्या जेवणाची सोय

Mumbai
७५ कुटुंबांना आसरा

कोर्टाची पायरी नको रे बाबा, अशी प्रतिक्रिया नेहमीच अनेकांची असते. पण हेच नकोसे वाटणारे कोर्ट आता कोल्हापूरच्या ७५ कुटुंबांना निवारा देत आहे. कोल्हापूर जिल्हा कोर्टात पुरामध्ये अडकलेल्या ७५ कुटुंबाना आसरा देण्यात आला आहे. बावड्यामध्ये राहणारी ही सर्व कुटूंबे असून या कुटुंबांना नुसता आसराच नाही तर इथे सुमारे ३०० जणांच्या जेवणासह अन्य सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूरच्या वतीने ही सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

या कोर्टात सुरुवातीला ७५ कुटुंबांना ठेवण्यात आले. मात्र जसेजसे पाणी ओसरू लागले, तसे इतर कुटुंबे आपल्या नातेवाईंकाकडे तर काही जण आपल्या घरी गेली. त्यामुळे आता अजून ११ कुटूंब या कोर्टात राहत असून येथे सकाळचा नास्ता ते रात्रीचे जेवण याची व्यवस्था एवढेच नाही तर डॉक्टरांकडून आरोग्यसेवाही दिली जात आहे. सुमारे ३०० जणांच्या जेवणाची इथे व्यवस्था केली जात आहे. दरम्यान, कोल्हापूरात भयंकर महापूर आला होता. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पूरग्रस्तांना निवारा पुरवण्याची सोय केली.

मात्र असा पूर हा पहिल्यांदा आल्याने कोर्टाने देखील इतिहासात पहिल्यांदाच असा निर्णय घेतला असे अधीक्षका विना कट्टी यांनी यांनी सांगितले. सध्या कोल्हापुरात मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था धावून येत असून, अशीच मदत जिल्हा कोर्टात असलेल्या कुटूंबाना देखील मिळत असून, कुणी कपडे, कुणी अन्न धान्य तर कुणी दुधाची तसेच इतर पदार्थांची व्यवस्था देखील करत आहेत.