घरताज्या घडामोडीराणे कोकणच्या विकासकामांत खोडा घालण्याचे काम करतात - राऊत

राणे कोकणच्या विकासकामांत खोडा घालण्याचे काम करतात – राऊत

Subscribe

मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर नारायण राणे यांनी टीका केली होती. नारायण राणे यांना प्रत्युत्तर देताना शिवसेना खासदार विनायक राऊतांनी टीकेची तोफ डागली आहे. मुख्यमंत्र्यांनी कोकणला भरभरून दिल्यानेच राणेंचा जळफळाट होत असल्याचं राऊत म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसीय कोकण दौरा नुकताच पार पडला. मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर नारायण राणे यांनी ‘मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी आले होते’, अशी उपहासात्मक टीका केली होती. ‘घोषणांपलीकडे मुख्यमंत्र्यांनी कोकणाला काहीही दिलेले नाही’, असा थेट आरोप राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केला. यावर खासदार विनायक राऊत यांनी कणकवलीत पत्रकार परिषद घेऊन राणेंचे सर्व आरोप फेटाळून लावत ‘राणेच कोकणच्या विकासकामांत खोडा घालण्याचे काम करतात’, असा उलट आरोप केला.

‘मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा यशस्वी झाला असून ही बाब न पचल्यानेच राणेंचा जळफळाट होत आहे’ असं राऊत म्हणाले. ‘कोकणातील चिपी विमानतळ आणि सी-वर्ल्ड प्रकल्प रखडण्यास नारायण राणेच जबाबदार आहेत. सी-वर्ल्ड प्रकल्प तीनशे एकरमध्ये होऊ शकतो, मग राणेंना तेराशे एकर जमीन कशासाठी हवी होती?’ असा सवाल राऊत यांनी राणेंना केला आहे.

- Advertisement -

‘१ मेलाच चिपीवर विमान उतरणार’

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सर्व प्रकल्प वेळेतच पूर्ण होणार आहेत. सिंधुरत्न योजना ही कोकण विकासाला चालना देणारी आहे. या योजनेसाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही’, असं देखील राऊत म्हणाले. ‘मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे १ मे रोजीच चिपी विमानतळावर विमान उतरणार’, असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -