मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज

१० जुनपासून कोंकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक

Mumbai
konkan railway
मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज

मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. कोरोनाच्या संकटात कोकण रेल्वेने पूर्ण क्षमतेने आपं योगदान दिलं आहे. मजुरांची वाहतूक असो किंवा मालवाहतूक कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी मोठी मेहनत घेत सेवा दिली. दरम्यान, यंदाच्या पावसाळयात कोकण रेल्वे सुरळीत धावावी यासाठी योग्य ती पावले उचलली आहेत. मान्सुनपुर्व रेल्वे देखभाल दुरूस्तीची कामे वेळात पुर्ण केली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात कोकण रेल्वे पूर्णत: सज्ज आहे. दरवर्षीप्रमाणे पावसाळी वेळापत्रक यावर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार असलं तरी, या मार्गांवर मात्र रेल्वे मंत्रालयाने ठरवून दिलेल्याच स्पेशल ट्रेन धावणार आहेत. अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

पावसाळयात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. यात रेल्वेचे आर्थिक नुकसान होण्यासह प्रवाशांच्या सुरक्षितेचा प्रश्नही ऐरणीवर येतो. याच धर्तीवर कोकण रेल्वेने सुरक्षिततेच्या द्दष्टिकोनातून तयारी केली आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी तब्बल ९७४ रेल्वे कर्मचारी २४ तास पेट्रोलिंग साठी तैनात केले जाणार आहेत. रेल्वे मार्गावर कुठेही पाणी तुंबू नये याची खबरदारी घेतली आहे. विद्युत पोल, रेल्वे मार्गांवरील वाढलेली झाडांची कटाई आणि रुळांची दुरूस्ती अशी सर्व कामे ठराविक कालावधीत पूर्ण करण्यात आली आहेत.


हेही वाचा – जिओ प्लॅटफॉर्मने सहा आठवड्यांत कमावले ९२,२०२ कोटी रुपये


मुसळधार पावसात रेल्वे मार्गावर द्दश्यमानता कमी झाल्यास लोको ड्रायव्हरला (रेल्वे गाडी चालक) ४० किलोमीटर प्रति तास वेगाने गाडी चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कोलाड ते थोकुर दरम्यान दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे या घटना रोखण्यासाठी सुद्धा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन स्थितीत तत्काळ मदत मिळावी यासाठी ठराविक अंतरांवर पोकलेन मशिन्स सारखी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तर आपत्कालीन स्थितीत मदतीकरिता अँसिडेंन्ट रिलीफ मेडिकल व्हॅन रत्नागिरी आणि वेरना, गोवा इथे तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच मुसळधार पावसाच्या काळात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्याची माहिती देण्यासाठी ९ स्थानकांमध्ये पर्जन्य मापक यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडपी या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. यामुळे अतिवृष्टी काळात ही यंत्रणेद्वारे आपात्कालीन परिस्थितीच्या सुचना मिळणार आहेत.