घरमहाराष्ट्रपहिल्या फेरीपासूनच कोटक विजयावर स्वार

पहिल्या फेरीपासूनच कोटक विजयावर स्वार

Subscribe

ईशान्य मुंबईत भाजपचा सव्वा दोन लाखांच्या मतांनी विजय

भाजपचे किरीट सोमय्या यांच्यामुळे शिवसेनेने प्रतिष्ठेची बनवलेल्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार मनोज कोटक यांचा तब्बल 2 लाख 26 हजार 486 मतांनी विजय झाला. कोटक यांचा विजय निश्चित असल्याचे लक्षात येताच शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. तसेच विक्रोळी परिसरात जल्लोष करत कार्यकर्त्यांनी विजयाची रॅलीही काढली. चुरशीच्या समजल्या जाणार्‍या या लढतीत कोटक पहिल्या फेरीपासूनच आघाडी ठेवत विजयावर स्वार झाल्याचे पहायला मिळाले.

ईशान्य मुंबई मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील यांनी भाजपने मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर कोटक हे फारच कमकुवत प्रतिस्पर्धी असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे पाटील यांचा विजय निश्चित समजला जात होता, परंतु 23 मे रोजी मतमोजणीवेळी सुरू झालेल्या फेर्‍यांमधून मात्र वेगळेच चित्र समोर आले. पहिल्या काही फेर्‍यांमध्ये घाटकोपर व मुलुंडमधील गुजरातीबहुल मतदारांमुळे कोटक आघाडीवर असल्याचे बोलले जाऊ लागले. शेवटच्या टप्प्यात रमाबाई नगर, मानखुर्द व शिवाजीनगर या परिसरातील पाटील यांना मोठी आघाडी मिळेल अशी चर्चा मतदारसंघामध्ये व कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.

- Advertisement -

इतकेच नव्हेतर भाजपमधीलही काही नेत्यांकडून मानखुर्द व शिवाजी नगर परिसरातून होणार्‍या मतदानाबाबत शंका उपस्थित करण्यात येत होती. नवव्या फेरीनंतर कोटक यांनी एक लाखाचा टप्पा ओलांडल्यानंतरही भाजपच्या नेत्यांमध्ये धागधूक सुरू होती. मात्र, प्रत्येक फेरीमध्ये कोटक यांना मतदारांनी दिलेल्या आघाडीने हळुहळू ही चर्चा ही थांबली. दुपारी दीड वाजेपर्यंत कोटक यांनी एक लाखापेक्षा जास्त मतांची आघाडी घेतल्यावर मात्र कोटक व भाजप कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला. आपला विजय निश्चित झाल्याचे लक्षात आल्यावर कोटक यांनी मतमोजणी केंद्रावर येऊन आपला विजय स्पष्ट झाल्याचे सांगितले.

कोटक यांना 5 लाख 14 हजार 599 मते मिळाली तर संजय पाटील यांना 2 लाख 88 हजार 113 मते मिळाली. कोटक यांनी तब्बल 2 लाख 26 हजार 486 मतांनी संजय पाटील यांचा पराभव केला. ईशान्य मुंबईमध्ये घाटकोपर, विक्रोळी, मानखुर्द व भांडुप भागामध्ये प्रकाश आंबेडकर यांना मानणारा एक वर्ग असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराकडून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही लढत चुरशीची ठरेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला फारशी चमक दाखवता आली नाही. कोटक यांनी संपूर्ण मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत आपले वर्चस्व कायम ठेवले. कोटक यांचा विजय जवळपास निश्चित झाल्याचे लक्षात आल्यावर शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला. मुलुंड, विक्रोळी व भांडुपमध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला.

- Advertisement -

शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फटाके वाजवत विजय साजरा करण्यास सुरुवात केली. तर सायंकाळी विजय झाल्याचे जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांनी पुन्हा जोरदार रॅली काढत विजय साजरा केला.

निवडणूक अधिकारी दोन फेर्‍यांच्या निकालाबाबत अनभिज्ञ
मतदान केंद्रावर सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू करण्यात आली. मतमोजणी सुरू करून पहिल्या दोन फेर्‍यांची मतमोजणी होऊन तिसरी फेरी सुरू झाली. मात्र, तिसर्‍या फेरीची मतमोजणी सुरू झाली तरी ईशान्य मुंबईचे निवडणूक अधिकारी विवेक गायकवाड यांना पहिल्या दोन फेर्‍यांच्या निकालाबाबत काहीच माहिती नव्हती. मतमोजणीचे वृत्तांकन करण्यासाठी मतदान केंद्रामध्ये पाहणी करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांशी चर्चा करताना त्यांनी तीन फेर्‍या झाल्या तरी दोन फेर्‍यांचा निकाल अद्याप माझ्याकडे आला नसल्याचे सांगितले.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -