कृष्ण प्रकाश यांच्या नियुक्तीसाठी गृहविभागाकडून हालचाली सुरू
औरंगाबादमधल्या मिटमिटा येथे पेटलेल्या कचरा प्रश्नावरून बराच मोठा वाद झाला होता. मार्च महिन्यात नागरिक आणि पोलीस यांच्यामध्ये झालेल्या दगडफेकीनंतर औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना मुख्यमंत्र्यांनी सक्तीच्या रजेवर पाठवले. औरंगाबादच्या पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त भार मिलिंद भारंबे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा दोन गटात उसळलेल्या दंगलीनंतर औरंगाबाद शहरात असंतोषाचे वातावरण पसरले. या सगळ्या प्रकरणानंतर औरंगाबाद शहर आता पूर्वपदावर आले आहे. मात्र आता कृष्णप्रकाश यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
कोण आहेत आयपीएस कृष्णप्रकाश ?
कृष्णप्रकाश हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. धडाडीचे पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. मिरज दंगल प्रकरण, अहमदनगरमधील कायदा व सुव्यवस्था हाताळत असताना कृष्णप्रकाश यांनी चांगली कामगिरी केली होती.
पडसलगीकरांसह अन्य तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची पुढच्या चार महिन्यात निवृत्ती
पुढच्या चार महिन्यात पोलीस दलात मोठे फेरबदल होण्याची चिन्हे आहेत. ३१ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत मुंबई पोलीस दलाचे आयुक्त दत्ता पडसलगीकरांसह अन्य चार महासंचालक दर्जाच्या अधिकारी सेवानिवृत्ती होत आहेत. यामध्ये राज्य पोलीस दलाचे प्रमुख सतीश माथूर, गृहनिर्माण कल्याण महामंडळाचे व्ही.डी. मिश्रा आणि न्यायवैधक व तंत्र दलाचे एस. पी. यादव यांच्या नावाचाही समावेश आहे. चार बड्या अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती एवढ्या कमी कालावधीत होत असल्याने या चारही पदांवरील नियुक्त्या करणे हे मुख्यमंत्र्यांसाठी आव्हान असणार आहे.