घरमहाराष्ट्रजन्म दिला मुलाला, पालकांच्या हाती दिली मुलगी

जन्म दिला मुलाला, पालकांच्या हाती दिली मुलगी

Subscribe

जन्माला मुलगा आला होता, मात्र हाती दिली मुलगी, असा प्रकार बीडमध्ये घडला आहे. नवजात बाळाच्या आई- वडिलांनी तसा आरोप केला आहे. बीडच्या जिल्हा रुग्णालयात एका महिलेची प्रसुती झाली. त्यावेळी मुलगा झाला. मात्र बाळाला ऑक्सिजन देण्यासाठी शहरातील दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल केले, तेव्हा उपचारानंतर हातात मुलगी दिली, असा आरोप बाळाच्या आई-वडिलांनी केला आहे. त्याबाबत बीड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील छाया थिटे या बीड तालुक्यातील ब्रम्हनाथ तांडा इथे शेतमजुरी करतात. त्यांना प्रसुतीसाठी बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. ११ तारखेला छाया यांनी एका मुलाला जन्म दिल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीच आपल्याला दिल्याचा दावा थिटे कुटुंबियांचा आहे. त्यावेळी आज्जीने आणि मामाने मुलगाच असल्याचे पाहिले. एव्हढेच नाही तर शासकीय रुग्णालयातील रेकॉर्डवरदेखील मुलगा असल्याची नोंद करण्यात आली.

- Advertisement -

तासाभराने बाळाची तब्येत बिघडल्यामुळे त्याला शासकीय रुग्णालयात काचेच्या पेटीत ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र बाळाची प्रकृती आणखी बिघडली. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला बालरोगतज्ज्ञांकडे म्हणजेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार पूर्ण झाल्यानंतर बाळ नातेवाईकांच्या हवाली करताना, हातात मुलगी सोपवण्यात आली. त्याबाबत विचारणा केली असता, उपचारासाठी मुलगीच आणली होती, असं सांगण्यात आले. या सर्व प्रकरणानंतर बाळाच्या वडिलांनी बाळ बदलल्याची तक्रार शहर पोलिसात दिली. या बळावर खासगी रुग्णालयात ९ ते १० दिवस उपचार करण्यात आले.

खासगी रुग्णालयात जेव्हा बाळ दाखल करण्यात आले, तेव्हा ती मुलगी असल्याचा उल्लेख डॉक्टरांनी केला. त्यामुळे खासगी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, छाया यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी मुलगीच आणली होती, तशी नोंद त्यांच्या रेकॉर्डवर आहे. जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालय या दोन अंतरामध्ये मुलाची मुलगी कशी झाली? या अजब प्रकारामुळे आई वडिलांसह नातेवाईक हादरले आहेत. जेव्हा मुलाचा जन्म झाला तेव्हा जिल्हा रुग्णालयातील जन्माच्या दाखल्यावर मुलगा असल्याची नोंद आहे, तर खासगी दवाखान्यात उपचारासाठी अ‍ॅडमिट होताना मुलगी असल्याची नोंद आहे. त्यामुळे हा प्रकार घडला कसा याचा तपास आता बीड शहर पोलीस करत आहेत.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -