विधिमंडळ पावसाळी अधिवेशन : मुख्यमंत्री दाखल होताच भाजप आमदारांची घोषणाबाजी

vidhan bhavan

कोरोनाच्या धर्तीवर आजपासून विधिमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधानभवनात दाखल होताच भाजप आमदारांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. वैद्यकीय प्रवेशासाठी असलेलं प्रादेशिक आरक्षण रद्द करा, अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधानभवनात दाखल होताच मराठवाड्यातील भाजप आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. वैद्यकीय प्रवेशासाठी असलेलं प्रादेशिक आरक्षण ७०-३० सुत्र रद्द करा अशी मागणी करत घोषणाबाजी करायला सुरुवात केली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार विधीमंडळात दाखल होताच पुन्हा घोषणाबाजी करायला सुरुवात केली. अजित पवार यांनी या आमदारांशी चर्चा केली. त्यानंतर आमदारांनी आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं.

दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात कोरोनाचे संकट लक्षात घेत प्रत्येक आमदाराची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. आमदारांना मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज असे साहित्य दिले गेले आहे. त्यामुळे विधिमंडळात ‘मास्कधारी’ सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर बरसताना दिसतील.