कोकणात जाणार्‍या रेल्वेगाड्या रिकाम्याच, दररोज लाखोंचा तोटा!

dadar sawantwadi express
दादर - सावंतवाडी एक्सप्रेस

अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने रेल्वे गाड्या हळूहळू रुळावर येत असून कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे गाड्या धावत आहेत. मात्र प्रवाशांच्या अल्प प्रतिसादमुळे या गाड्या रिकाम्या धावत असल्याने दररोज लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. एरवी गर्दीने भरून वाहणार्‍या लोकमान्य टिळक ते थिरुअनंतपुरम, एर्नाकुलम एक्स्प्रेस, दादर-सावंतवाडी तुतारी स्पेशल एक्स्प्रेस आणि बंगळुरु सिटी या चारही गाड्यांमधून केवळ 40 ते 70 टक्केच प्रवासी प्रवास करत असल्याचं समोर आलं आहे.

२६ सप्टेंबरपासून गाड्या सुरू!

राज्यात अनलॉक ४ तसेच त्या पाठोपाठ अनलॉक ५ चे नियम जारी करण्यात आल्याने ठप्प असलेले व्यवहार पूर्ववत होऊ लागले आहेत. यानुसार कोकण रेल्वे मार्गावर लोकमान्य टिळक ते थिरुअनंतपुरम, एर्नाकुलम एक्स्प्रेस, दादर-सावंतवाडी तुतारी स्पेशल एक्स्प्रेस आणि बेंगळुरु सिटी या चार गाड्या २६ सप्टेंबरपासून धावू लागल्या आहेत. मात्र, सध्या या गाड्यांकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याने रेल्वेला दररोज लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या रेल्वे गाड्या बाराही महिने हाऊसफुल्ल धावतात. कोकणकन्या एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, जनशताब्दी, मत्स्यगंधा, तुतारी एक्स्प्रेस या गाड्यांमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या इतकी जास्त असते की, वर्षाच्या कोणत्याही दिवशी गेले तरी वेटिंग तिकीट घ्यावे लागते. मात्र कोरोनामुळे प्रवाशांनी या गाड्यांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वेचे आर्थिक नुकसान होत आहे.