कोरोनाचा एकत्रितपणे सामना करू, मुख्यमंत्र्यांना चंद्रकांत पाटीलांचे पत्र!

chandrakant patil

राज्यात गेल्या सहा महिन्यापासून सुरू असलेल्या कोरोना साथीचा दिवसेंदिवस उद्रेक होत चालला आहे. अशावेळी राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्ष आणि प्रमुख सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना करू या, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केले आहे.

कोरोनाचे संकट गंभीर बनल्याने या परिस्थितीत सातत्यपूर्ण काम करणाऱ्या काही प्रमुख सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना करण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध राजकीय पक्षांसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,  जनकल्याण समिती, भारतीय जैन संघटना, इस्कॉन, टाटा ट्रस्ट, आर्ट ऑफ लिव्हिंग इत्यादी सर्वांनी एकत्रितपणे परिस्थितीचे विश्लेषण करणे, यावरील उपाययोजना ठरविणे आणि कामाची वाटणी करणे हे खूप आवश्यक आहे, असे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

सरकारी रुग्णालयांच्या बेड्सच्या संख्येची मर्यादा आहे. खूप मोठ्या संख्येने रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे या परिस्थितीचा सामना करणे शक्य होत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांकडे सरसकट संशयाच्या नजरेने पाहणे चुकीचे आहे, असे मत पाटील यांनी मांडले आहे.

सध्या खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण खूप मोठ्या संख्येने उपचार घेत असल्यामुळे त्या रुग्णालयांना महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेव्यतिरिक्त प्रतिदिन, प्रति बेड अशा निश्चित रकमेची राज्य सरकारकडून  थेट हमी देणे गरजेचे आहे, अशी सूचना चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.


हे ही वाचा – परिक्षेचा पॅटर्न ठरला, या पध्दतीने होणार अंतिम वर्षाच्या परीक्षा!