घरCORONA UPDATECoronavirus Maharashtra: राज्यातील कोरोना पॉझिटिव्हच्या आकडेवारीतील घोळ - देवेंद्र फडणवीस

Coronavirus Maharashtra: राज्यातील कोरोना पॉझिटिव्हच्या आकडेवारीतील घोळ – देवेंद्र फडणवीस

Subscribe

लक्षणे नसलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी न करण्याचा निर्णय परत घेण्याची तसेच आयसीएमआरच्या निकषांचे तंतोतंत पालन करण्याची विनंती पुन्हा एकदा करीत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या आकडेवारीतील घोळ दूर करूनच कोरोनाविरूद्धचे हे युद्ध आपल्याला प्रभावीपणे लढता येईल, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या आशयाचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पाठविले आहे.

या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, दि. १५ एप्रिल २०२० रोजी मुंबई महापालिकेने लक्षणे नसलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी बंद करण्याचा निर्णय घेतला. याठिकाणी राज्य सरासरीच्या कितीतरी अधिक नमूने पॉझिटिव्ह आले आहेत, हे आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणूनच आयसीएमआरच्या नव्या गाईडलाईन्सप्रमाणे ‘अ‍ॅग्रेसिव्ह टेस्टिंग’ हीच रणनीती आता वापरावी, अशी माझी विनंती आहे. लक्षणे नसलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींसंदर्भात १०० टक्के चाचण्या केल्याच पाहिजेत, असे दिशानिर्देश ‘आयसीएमआर’ने स्पष्टपणे दिले असताना आम्ही मात्र आवश्यकता वाटली तर करता येईल, असा आदेश काढला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधीद्रव्य विभागाच्या दि. १८ एप्रिल २०२० च्या अहवालाकडे लक्ष वेधून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात उपलब्ध केसेसपैकी ६३ टक्के रूग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. तर रूग्णालयात दाखल झालेल्यांपैकी ७९ टक्के रूग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. याचाच अर्थ लक्षणे नसलेल्या व्यक्तींच्या चाचण्या न करण्याचा निर्णय किती घातक ठरू शकतो, हे स्पष्ट होते. त्यामुळे सांख्यिकीदृष्ट्या ही रूग्णसंख्या कमी दिसेल आणि प्रत्यक्षात मात्र धोका वाढेल. त्यामुळे असे निर्णय करणे योग्य होणार नाही.

- Advertisement -

कोरोना पॉझिटिव्हच्या आकडेवारीसंदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, दि. १८ एप्रिल २०२० रोजी मुंबईतील कोविड पॉझिटिव्ह रूग्णांची राज्य सरकारने दिलेली संख्या १८३ इतकी आहे. हीच संख्या मुंबई महापालिकेने ८७ इतकी दिली. मात्र, त्याचवेळी मुंबई महापालिकेने तळटीप टाकून ४ खाजगी प्रयोगशाळांनी दि. १२ ते १५ एप्रिल २०२० या दरम्यान केलेल्या चाचण्यांचा अहवाल आज दिला असून, त्यात ३०२ अहवाल पॉझिटिव्ह आले, असे सांगितले आहे. मुंबई महापालिकेने सांगितले आहे की, तळटिपेत दाखविलेले व्यक्ती हे यापूर्वीच रूग्णालयात दाखल झालेले असल्याने ‘रूग्णालयात दाखल’ या रकान्यात आहेत. मात्र ते ‘कोरोना पॉझिटिव्ह’ च्या एकूण संख्येत समाविष्ट करण्यात आले आहेत का, हे समजत नाही आणि तसे न करण्याचे कारणही लक्षात येत नाही. महापालिकेने ही संख्या ८७ अधिक ३०२ दाखविणे आवश्यक होते, त्यामुळे एकूणच रिपोर्टींगमध्ये त्रुटी का येत आहेत, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

तसेच दि. १८ एप्रिल २०२० च्या सकाळच्या अहवालात १७ तारखेला मुंबईत १२ कोविड पॉझिटिव्ह प्रकरणे आहेत, असे नमूद करण्यात आले आहे. परंतू त्यादिवशी आलेल्या एका खाजगी प्रयोगशाळेचा रिपोर्ट त्यात का सम्मिलित करण्यात आला नाही व तो का थांबविण्यात आला, तसेच त्यादिवशी कस्तुरबा रूग्णालयाचा अहवाल सुद्धा का समाविष्ट होऊ शकला नाही, याची कारणे काय आहेत, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. एकूण ही सर्व परिस्थिती पाहता ‘कोविड पॉझिटिव्ह’च्या संख्येची लपवालपवी करण्याचा प्रयत्न का होतो आहे, हा प्रश्न निर्माण होतो. माझी आपल्याला विनंती आहे की, आपण स्वत: यात गांभीर्याने लक्ष द्यावे व लक्षणे नसलेल्या व्यक्तींची चाचणी तसेच कोविड पॉझिटिव्हचे उचित रिपोर्टिंग होईल, याकडे लक्ष द्यावे. यातूनच प्रश्नाची व्याप्ती लक्षात घेऊन आपल्याला आपली लढाई योग्य दिशेने नेता येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -