Saturday, August 8, 2020
Mumbai
27 C
घर महाराष्ट्र पराभवाची कारणीमीमांसा शोधण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक

पराभवाची कारणीमीमांसा शोधण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक

Mumbai
NCP Congress party joint meeting mahaaghadi
काँग्रेस - राष्ट्रवादी आणि महाआघाडीतील पक्ष

लोकसभा निवडणुकीत २०१४ प्रमाणेच यंदाही काँग्रेस-राष्ट्रवादीचा राज्यात दारूण पराभव झाला. राष्ट्रवादीने मागच्या वेळेप्रमाणेच चार जागा जिंकल्या असल्या तरी त्यांना माढा आणि कोल्हापूर हे दोन मतदारसंघ गमवावे लागले आहेत. काँग्रेसलाही मागच्या वेळेस जिंकलेले नांदेड आणि हिंगोली या दोन मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. चंद्रपूर येथील एकच जागा काँग्रेसला जिंकता आली. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी मंगळवारी (२८ मे) दुपारी १२ वाजता महाआघाडीतील पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि महाआघाडीतील इतर नेते उपस्थित राहणार आहेत.

बैठकीची बातमी – महाआघाडीचे आमदार भाजपमध्ये जाणार? विरोधकांना आमदार वाचवण्याची चिंता

१ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसची चिंतन बैठक होणार आहे. या बैठकीला पक्षाचे राज्यातील सर्व आमदार आणि लोकसभेचे उमेदवार उपस्थित राहणार आहेत. मात्र त्यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे महाआघाडीच्या पक्षांशी मंगळवारी संवाद साधतील. लोकसभेला झालेल्या दारूण पराभवाची कारणे काय आहेत? वंचित बहुजन आघाडीचा परिणाम कसा आणि कुठे-कुठे झाला? ईव्हीएमबद्दल महाआघाडीच्या नेत्यांचे काय म्हणणे आहे? याची माहिती या बैठकीत घेतली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

हे वाचा – पार्थच्या पराभवावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा हातकंणगले मतदारसंघात नवख्या धैर्यशील माने यांच्याकडून धक्कादायक पराभव झालेला आहे. महाआघाडी असूनही हा पराभव कसा काय झाला? याचीही चर्चा बैठकीत केली जाण्याची शक्यता आहे. २०१४ साली मोदी लाट होती. मात्र यावेळी सरकारच्या विरोधात जनतेमध्ये असंतोष दिसत होता. खासकरून ग्रामीण भागात शेतकरी वर्गात खदखद होती. ही खदखद मतपेटीतून महाआघाडीच्या पथ्यावर पडेल, अशी आशा सर्वच विरोधी पक्षांना होती. मात्र २३ मे रोजी आलेले निकाल विरोधकांसाठी धक्कादायक असे होते. २०१४ पेक्षाही २०१९ मध्ये भारी बहुमतासहीत भाजप सत्तेवर आरूढ झाले आहे. याबाबत महाआघाडीच्या बैठकीत मंथन केले जाणार आहे.