घरमहाराष्ट्रलोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात सरासरी ६१.३० टक्के मतदान

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात सरासरी ६१.३० टक्के मतदान

Subscribe

लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले असून राज्यात सरासरी ६१.३० टक्के मतदान झाल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात १४ मतदार संघांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे ६१.३० टक्के मतदान झाले असून काही मतदान केंद्रांवर सायंकाळी सहानंतरही मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरु होते. दिवसभरात कुठेही अनुचित प्रकार घडल्याची घटना झाली नसून मतदान शांततेत पार पडले आहे. राज्यात आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये ६३.०४ टक्के तर दुसऱ्या टप्प्यात ६२.८८ टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड उपस्थित होते.

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड

काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते तात्काळ बदलून देण्यात आले. आज झालेल्या १४ मतदार संघात एकूण २४९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर २८ हजार ६९१ मतदान केंद्रांपैकी ३ हजार ८२५ मतदान केंद्रांचे लाईव्ह वेबकास्टींग करण्यात आले. १ लाख ५४ हजार कर्मचारी या मतदान केंद्रांवर कार्यरत होते. तर ९० मतदान केंद्रांवर संपूर्ण महिला कर्मचारी होत्या. त्याचप्रमाणे चार मतदान केंद्र हे दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे कार्यरत होते.

- Advertisement -

६ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी 

  • जळगाव – ५८ टक्के
  • रावेर – ५८ टक्के
  • जालना – ६३ टक्के
  • औरंगाबाद – ६१.८७ टक्के
  • रायगड – ५८.०६ टक्के
  • पुणे – ५३ टक्के
  • बारामती – ५९.५० टक्के
  • अहमदनगर – ६३ टक्के
  • माढा – ६३ टक्के
  • सांगली – ६४ टक्के
  • सातारा – ५७.०६ टक्के
  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग – ६२.२६ टक्के
  • कोल्हापूर – ६९ टक्के
  • हातकणंगले – ६८.५० टक्के

आज सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांचा चांगल्या प्रमाणावर प्रतिसाद दिसून आला. सुरुवातीला मॉक पोलमध्ये ईव्हीएम नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तात्काळ ते बदलण्यात आले. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेस दिवसभरात एकूण ३३४ बॅलेट युनिट (बीयू) आणि २२९ सेंट्रल युनिट (सीयू) तर ६१० व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. मतदान यंत्र बदलून देण्याकरिता १४ मतदार संघांमध्ये एकूण २ हजार २८० वाहने ठेवण्यात आली होती. ही वाहने जीपीएसद्वारे ट्रॅक केली जात होती. त्यामध्ये राखीव यंत्र ठेवण्यात आले होते. मतदान यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी आल्या ते बदलण्याकरिता या वाहनांचा वापर करण्यात आला. सुमारे १५ ते २० मिनिटांच्या आत मशिन बदलण्यात आले असून त्यामुळे मतदानात कोठेही खंड पडला नाही.  – दिलीप शिंदे, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी

मतदाराविरोधात गुन्हा दाखल

१४ मतदार संघात २ कोटी ५७ लाख ८९ हजार ७३८ मतदार होते. त्यापैकी १ कोटी ३३ लाख १९ हजार पुरुष तर १ कोटी २४ लाख ७० हजार महिला मतदार आणि ६५२ तृतीय पंथी मतदार होते. रावेर मतदार संघात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बाबत अमोल सुरवाडे या मतदाराने संशय व्यक्त केला होता. त्यावर मतदान केंद्राध्यक्षांनी तांत्रिक बाब पूर्ण करण्याकरिता सर्वांसमक्ष मतदानाची चाचणी घेतली. त्यात सुरवाडे यांनी घेतलेल्या संशयात तथ्य न आढळल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

टीकटॉक ॲपवर मतदान केले लाईव्ह

मतदान करताना गोपनीयतेचा भंग होणार नाही यासाठी मतदारांना आवाहन करण्यात आले होते. तसेच मतदान केंद्रांमध्ये मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक यंत्र नेण्याची परवानगी नाही, असे असताना देखील आज औरंगाबाद येथे एका अज्ञात व्यक्तीने टीकटॉक ॲपवर मतदान प्रक्रियेचे लाईव्ह चित्रिकरण पोस्ट केले आहे. त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईत झालेल्या एका सभेत सहायक पोलीस आयुक्त नरसिंग यादव यांचा सहभाग आढळून आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -