घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टवाघाच्या जबड्यात घुसणार का ‘पंजा’?

वाघाच्या जबड्यात घुसणार का ‘पंजा’?

Subscribe

शिवसेनेचे लोखंडे- काँग्रेसचे कांबळे आमनेसामने; मतविभाजन कोणाच्या पारड्यात?

2008 मध्ये आस्तिवात आलेल्या अनुसुचित जातीसाठी राखीव शिर्डी लोकसभा मतदारसंघात बोलण्यापुरते काँग्रेसचे वर्चस्व असले तरी २००९ निवडणुकीपासून शिवसेनेलाच साईंबाबांनी विजयाचा ‘लाडू’ खाऊ घातला आहे. यंदा सेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा संधी दिली असून काँग्रेसने श्रीरामपूरचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांना मैदानात उतरवले आहे. ऐनवेळी विखे गटातून थोरात गटात ‘लांबउडी’ घेऊन कांबळे यांनी जरी उमेदवारी मिळवली असली तरी विजयाची फटाका लड उडवण्यासाठी त्यांना जीवाचे रान करावे लागणार आहे. सुजय विखे यांचा भाजप प्रवेश, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची नाराजी, भूमिका, काँग्रेसचे गटातटाच राजकारण, अंतर्गत नाराजी, अशी अनेक आव्हाने कांबळे यांच्यासमोर आ वासून उभी आहेत. ‘ विखे शिवसेनेलाच मदत करणार असल्याचे वक्तत्व लोखंडे यांनी करून संभ्रमाचे पिल्लू सोडून दिले आहे. याचा काय परिणाम होतो, हे निकालानंतरच समोर येईल. यामुळे दक्षिण नगरबरोबरच शिर्डीच्या लढतीकडेही सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. यापैकी कोपरगाव, नेवासामध्ये बीजेपी, अकोला राष्ट्रवादी, संगमनेर, श्रीरामुपर, शिर्डीमध्ये काँग्रेसचे आमदार असून हे पारंपरिक काँग्रेसचे बालेकिल्ले आहे. माजीमंत्री मधुकर पिचड, माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील अशा महारथींचा हा मतदारसंघ आहे. एवढे असूनही अद्यापही काँग्रेसला येथे अद्याप विजयाला गवसणी घालता आलेली नाही. याला कारणही विखेंचे राजकारण असून काँग्रेसचे पाडीपाडीचे राजकारण आणि ‘हो ला हो’ करणारा उमेदवार असावा, या हट्टापायी स्वत:हून ही जागा काँग्रेसने वाघाच्या जबड्यात घातली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा पराभव ही काँग्रेसजणांनीच घडवून आणला आणि मर्जीतले भाऊसाहेब वाकचौरे यांच्या गळ्यात विजयाची माळ टाकली. या पराभवामुळे आठवले कायमचे आघाडीपासून दुरावले आणि भाजपच्या गोटात स्थिरावले. २०१४ मध्ये वाकचौरे यांना विखे यांनी सेनेतून काँग्रेसमध्ये आणून उमेदवारीही दिली. परंतु, त्यांना पराभवाचे तोंड बघावे लागले. यंदा पुन्हा वाकचौरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी करण्याचे जाहीर केले आहे. वंचित आघाडीनेही आपला उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे समीकरण बदलली आहेत.

- Advertisement -

सदाशिव लोखंडे यांनाही अनेक अडचणीला तोंड द्यावे लागणार आहे. मागच्यावेळी मोदी लाटेत लोखंडेंनी आपली नाव तारली, परंतू यंदा तशी परिस्थती नाही. उमेदवार स्थानिक हवा, ही भावना मतदारांमध्ये प्रबळ झाली आहे. पाच वर्षात लोखंडे यांचे मतदारांना साधे मुखदर्शनही घडले आहे. याबद्दल मतदारांमध्ये रोष आहे, याची जाणीव झाल्याने त्यांनी स्थानिक होण्यासाठी श्रीरामपूरात नवीन घर बांधून त्यांची वास्तूशांती केली. घर घेऊन स्थानिक होण्याची मात्रा मतदारांवर लागू पडते की नाही, हे येणारा काळच ठरवणार आहे. शिवसेनेतील गटातटातील नाराजी दुर करून लोखंडे यांनी मनोमिलन करण्याचा प्रयत्न केला. परंतू, शिवसेनेतील नाराज गट उघड बोलत नसले तरी त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही. विखे मदत करणार की नाही, यावरही बरेच लोखंडे यांचे भवितव्य अंवलंबून आहे.

शिर्डीकडे नको, दक्षिणकडे लक्ष द्या…
ऐन मोक्यावर भाऊसाहेब कांबळे यांनी थोरात गटाचे बोट पकडून विखेंची नाराजी ओढावून घेतली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यात पदधिकारी- कार्यकर्त्यांच्या गाटीभेटी सुरू केल्या आहे. एका बैठकीत विखे यांनी कार्यकर्त्यांना शिर्डीकडे लक्ष देऊ नका, दक्षिणकडे लक्ष द्या, असे बोलल्याचे सांगितले जात आहे. यामुळे कार्यकर्ते शिर्डीकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. दुसरीकडे सुजय विखे यांनी शिर्डीत शिवसेनेला मदत करण्याचा शब्द दिल्याने त्यांचे समर्थकही सेनेच्या मदतीला उतरले आहेत. अपक्ष भाऊसाहेब वाकचारै, वंचित आघाडीमुळे बरेच मतविभाजन होण्याची शक्यता आहे. हे मतविभाजन कोणाच्या पारड्यात विजयाचे दान टाकते, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

- Advertisement -

२००९ लोकसभा निवडणूक
पक्ष- उमेदवार- मते
शिवसेना- भाऊसाहेब वाकचौरे-३५९,९२१
आरपीआय (ए)- रामदास आठवले-२२७, १७०
अपक्ष- प्रेमानंद रूपवते-२२, ७८७

२०१४ लोकसभा निवडणूक
पक्ष- उमेदवार- मते
शिवसेना- सदाशिव लोखंडे-५३२,९३६
काँग्रेस- भाऊसाहेब वाकचौरे-३३३,०१४
आप- नितिन उदमले-११,५८०
बीएसपी- महेंद्र शिंदे-१०,३८१

मतदारसंघातील मतदारंची एकुण संख्या : 1,459,712
पुरूष मतदार : 765,921
महिला मतदार : 693,791

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -