घरमहाराष्ट्रयुतीच्या विजयात राज टाकणार मिठाचा खडा

युतीच्या विजयात राज टाकणार मिठाचा खडा

Subscribe

बातमीचे विश्लेषण

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 48 तास उरलेले आहेत. या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेचा एकही उमेदवार रिंगणात नाही. तरीही राज्यभरात राज ८ ते १० ठिकाणी सभा घेणार आहेत. २००९ सालीच्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या उमेदवारांना शहरी भागात काही लाखांत मते मिळाली होती. तर २०१४ सालच्या निवडणुकीत काही हजारांत. आता मात्र 2019 मध्ये एकही जागा न लढवताही मनसे प्रचाराच्या रिंगणात आहे. यावेळी राज ठाकरे किंवा मनसेला गमवायचे काहीच नाही. स्वत:च्या पदरात काही पडणार नसले तरी भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी मनसैनिकांनी केली आहे. २००९ मध्ये मनसेच्या सहा उमेदवारांच्या लाखभर मतांनी युतीच्या सर्व उमेदवारांना पराभव पत्करावा लागला होता.

2014 प्रमाणे राज ठाकरे यावेळी गोंधळलेले नाहीत. २०१४ साली राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर शेकाप, जनता दल, भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. त्यामुळे शेवटपर्यंत ते कोणती भूमिका घेणार, याबाबत संभ्रम कायम होता. मोदी लाटेबरोबरच राज यांनी आयत्या वेळी घेतलेल्या निर्णयाचा फटका त्यांच्या पक्षाला बसला होता. आता मात्र तसे नाही. मागील 5 वर्षांत मनसेत पुलाखालुन बरेच पाणी वाहून गेले आहे. 2019 लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सहा महिने राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून भाजप तसेच मोदी -शहा जोडगोळीवर फटकारे मारत आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र नवनिर्मिण सेनेच्या निर्मितीनंतर मागील 13 वर्षांत पहिल्यांदाच राज यांनी घेतलेल्या भूमिकेवर वर्षभर कायम राहिल

- Advertisement -

राज यांच्याकडे आता एकही आमदार नसला तरी आणि नगरसेवकांचे जाळे नसले तरी आजही ‘क्राउडपुलर लीडर’ अशी त्यांची ओळख कायम आहे. आजही त्यांच्या रेकॉर्डब्रेक सभा होतात. आतापर्यंत सभांना जमणारी लाखांची गर्दी मतदानात मात्र हजार शेकड्यांवर येत होती. मात्र आता मते किती मिळतील याची भीती नसल्यानेच राज हे नाईट वॉचमनप्रमाणे न खेळता 20-20 मॅचप्रमाणे भाजपच्या विरोधात निकाल खेचून आणतील असा विश्वास मनसेच्या नेत्यांना वाटतो. या आधी झालेल्या मनसेच्या अनेक मेळाव्यांत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि भाजपविरुद्ध जाहीर भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांची आक्रमक भाषा आणि तीव्र शब्दांत केलेला हल्लामुळे भाजप विरुद्ध मनसे असा सामना रंगला आहे.

‘या लोकांच्या पार्श्वभागावर लाथ मारा आणि हाकलून द्या’. ‘मोदी आणि शाह हे राजकीय क्षितिजावरून घालवायचे म्हणून काळजावर दगड ठेवून मतदान करा’. ‘नरेंद्र मोदींना देशाने खूप चांगली संधी दिली होती. या संधीचं सोनं नरेंद्र मोदींना करता आलं असतं, मात्र ते त्यांना करता आलं नाही’. ‘मोदी आणि शाह या दोघांनीही थापा मारल्या आता या दोघांनाही हटवण्याची वेळ आली आहे’, असे राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात सांगितले आहे. नोटबंदीनंतर देशात ४ कोटी लोकांच्या नोकर्‍या गेल्या,९९.३%पैसे बँकेत परत आले. म्हणजे नोटबंदी ही अपयशी ठरली, अशी टीका राज ठाकरे यांनी मेळाव्यात केली.

- Advertisement -

2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेला 13 जागांवर यश मिळाले होते. त्यात 6 जागा मुंबईमधील, 2 जागा ठाण्यात, 3 नाशिक तर औरंगाबाद आणि पुण्यात प्रत्येकी 1 जागा मिळाली होती. मुंबई आणि मुंबई परिसरातील ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक येथे मनसेचे मतदार आहेत.

मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत 2014 मध्ये फक्त १ जागा देऊन मतदारांनी पक्षाला त्यांचे खरे स्थान दाखवून दिले.पक्षाची राज्यात झालेली पडझड या पार्श्वभूमीवर पक्षापासून दुरावलेल्या समर्थकांना पुन्हा पक्षाकडे खेचण्यासाठी त्यांनी हा नवा राजकीय प्रयोग सुरू केला आहे. या संवादानंतर पक्षाच्या विरोधात गेलेले वातावरण निवळेल आणि तेथूनच पक्षाच्या विधानसभा निवडणुकांच्या कामाला सुरुवात होईल, अशी आशा मनसेच्या नेत्यांना आहे.

खरं तर, एका तपानंतर पक्षाला नव्या ध्येय-धोरणांची गरज असताना, मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी गेले असताना, ’इंजिना’ची दिशा भरकटली असतानाही नेता स्वतःच्या पक्षाबद्दल काहीच बोलत नाही, आत्मपरीक्षण करत नाही, पुढे काय करणार आहोत सांगत नाही. २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात लाखो मते मिळविणार्‍या मनसेला 2014 च्या निवडणुकीत सपाटून मार खावा लागला. अनेक ठिकाणी पक्षाच्या उमेदवारंची डिपॉझिट जप्त झाली. महायुतीत जाण्याचे टाळणार्‍या राज यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देताना महायुतीच्या उमेदवारांच्या विशेषतः शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात पक्षाचे उमेदवार उभे केले होते. त्याचाही फटका मनसेला बसला.

मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार उभा नसला तरी राज ठाकरेंना मानणारा वर्ग, पहिल्यांदा मतदान करणारा मतदार, मतदान करणार आहे. युवकांचा राजकारण्यांवर राग असल्याने इंजिन जरी नसले तरी नोटा हा पर्याय अनेकांना जवळचा वाटल्यास राज युतीच्या विजयात मिठाचा खडा ठरू शकतो. ज्या सोशल मीडियाची कास धरून मोदी यांनी 2014 ची निवडणूक खिशात टाकली होती, राज त्याच मीडियाच्या व्हडिओ क्लिप, भाषण याचे प्रेझेंटेेशन करत असल्याने शहरातील तरुण आकर्षित होत आहे. त्यामुळे राज आपल्या उमेदवारांसाठी नव्हेतर देशावरील संकट दूर करण्यासाठी करीत असलेले आवाहन भाजप शिवसेना उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळवू शकेल यात शंका नाही.

कारण याच वाटेवरुन राज यांच्या मनसेच्या इंजिनाला विधानसभेत पुन्हा एकदा धडक मारायची आहे. त्यामुळे त्या इंजिनात दारुगोळा भरण्यासाठी मनाच्या विरोधात जावून, काळजावर दगड ठेवून भाजपला मतदान करु नका असे आवाहन राज करीत आहेत. पण शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही अच्छे दिन न आल्याने कास्तकार, शेतकरी, गरीब, मध्यमवर्गीय, नाराज आहे. त्यातच राज यांचे भाषण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या घरात पोहोचले तर, ‘दिनकरराव टोपी संभालो, हवा बहोत तेज है’, बोलण्याची वेळ येईल हे निश्चित. कारण ज्या महाराष्ट्रातून 42 ते 45 जागा जिंकणार असे भीमादेवी थाटात सांगणारे युतीचे चाणक्यही राजच्या गर्जनेनंतर धास्तावले आहेत. राज ज्या 8 ते 10 ठिकाणी सभा घेणार तिथले युतीचे उमेदवार मात्र गर्भगळीत झाले आहेत.

 

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -