घरमहाराष्ट्रमाढ्यात साम-दाम-दंड-भेद !

माढ्यात साम-दाम-दंड-भेद !

Subscribe

सोलापूर – ,सुर्यकांत आसबे -यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचे तिकीट देण्याच्या प्रक्रियेत आणि नेमका उमेदवार देण्यात कुठला मतदारसंघ राज्यात सर्वात जास्त चर्चेचा ठरला असेल तर तो सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघ. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव पुढे आल्यानंतर पुन्हा पवारांनी उमेदवारी मागे घेतली,त्यानंतर माढाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजप प्रवेश अशा घटनांनी माढा लोकसभा मतदारसंघ राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. अखेर राष्ट्रवादीने आधी भाजपसाठी काम करणारे संजय शिंदे यांना उमेदवारी देऊ केली तर अखेर भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर लढणार हे फायनल झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील महत्त्वाचे नेते असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही लढाई प्रतिष्ठेची बनवली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून जोरदार लढत होणार हे निश्चित. दोन्ही मातब्बर उमेदवारांची राजकीय गणिते शेवटी निवडणुकीचा निकाल ठरवणार आहेत.

संजय शिंदे यांची राजकीय गणिते

- Advertisement -

मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक म्हणून संजय शिंदे यांना ओळखले जाते. आजवर मोहिते पाटील आणि शिंदे हे दोघेही पवारांचे शिलेदार म्हणून ओळखले जात होते. जिल्ह्याच्या सत्ता संघर्षात दोन्ही गट आपल्या ताकदीने एकमेकांना चारीमुंड्या चीत करण्यासाठी काम करत आलेले आहेत. संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीमध्ये राहून आपल्याला जिल्ह्याचा नेता होणे अशक्य असल्याचे ओळखत भाजपशी आघाडी केली होती.

त्यामुळे अपक्ष असूनदेखील संजय शिंदे जि. प. अध्यक्ष बनले. मागील दोन वर्षांत त्यांनी जिल्ह्यात बार्शीचे राजेंद्र राऊत, पंढरपूरमध्ये आ. प्रशांत परिचारक, समाधान अवताडे, माळशिरसचे उत्तम जानकर, माणमध्ये आ. जयकुमार गोरे, फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकर यांना एकत्रित करत आपली मोठ बांधली. त्यानंतर मोहिते- पाटील भाजपमध्ये गेल्याने शिंदे यांच्यापुढे राष्ट्रवादीशिवाय पर्याय राहिला नाही. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील शिंदे हेच पक्षाचे उमेदवार असतील हे निश्चित केल्याने त्यांच्यापुढे पर्याय राहिला नाही. राष्ट्रवादीकडून संजय शिंदे तर भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटील लढाई होणार याची चर्चा माढ्यामध्ये जोरात होती. मात्र भाजपने मोहिते पाटील यांचे वेगळ्या प्रकारे ‘पुनर्वसन’ करत फलटणच्या रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्याने सहाजिकच संजय शिंदेंनी उभारलेल्या समविचारी मित्रांच्या आघाडीत बिघाडी झाली. तर राजेंद्र राऊत, परिचारक, अवताडे यांनी मुख्यमंत्र्यांचा आदेश सर्वोच्च मानत भाजप उमेदवाराला ताकद देण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

त्यामुळे शिंदे यांची ताकद काही प्रमाणात कमी झाली आहे.दुसरीकडे संजय शिंदे यांनी आता वाड्यावस्त्यावर जात ‘आपला माणूस’ ही प्रतिमा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ते यशस्वी होणार का हे काळच ठरवेल. स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाने ‘सुंठी वाचून खोकला गेला’ म्हणत शिंदे यांना विजयी करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.माढा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील चार तर सातारामधील दोन मतदारसंघ येतात. यामध्ये माढा, करमाळा आणि सांगोल्यामध्ये लीड मिळण्याची आशा शिंदे यांना आहे. तर मोहिते पाटलांच्या माळशिरसमध्ये किमान ५० टक्के मतदान मिळवणे शिंदे यांच्यासाठी गरजेचे आहे. माण आणि फलटणमध्ये निंबाळकर यांच्यामुळे काही प्रमाणात फटका बसू शकतो. या दोन्ही ठिकाणी जास्तीत जास्त मतदान पदरात पाडण्याचा प्रयत्न संजय शिंदे यांना करावा लागणार आहे.

रणजितसिंह निंबाळकर यांची राजकीय गणिते

सत्ताधारी भाजपचे उमेदवार असणारे निंबाळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख, विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील यांचे पाठबळ मिळणार आहे.मोहिते पाटील यांना जिल्ह्याच्या राजकारणात कमबॅक करण्यासाठी शिंदे यांचा पराभव होणे गरजेचे आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील हे आपल्या पारंपरिक विरोधकाला चीतपट करण्यासाठी सर्वतोपरी जोर लावणार आहेत. त्यामुळे माळशिरस आणि मोहिते-पाटील समर्थक आमदार नारायण पाटील यांचा मतदारसंघ करमाळ्यात निंबाळकर यांना चांगले मताधिक्य मिळू शकते.निंबाळकर यांचे होमग्राउंड असणार्‍या फलटण आणि माण भागात सग्यासोयर्‍यांची साथ मिळण्याची शक्यता जास्त आहे. असे झाल्यास, फलटण, माण, माळशिरस, करमाळ्यात त्यांना आघाडी मिळण्याची आशा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -