हातकणंगलेमध्ये राजू शेट्टींचा ‘स्वाभिमान’ पणाला

Mumbai

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मागील दोन निवडणुकीत स्वाभिमानी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी विजयी झाले. मात्र प्रत्येक वेळी त्यांनी त्यांची पक्षीय भूमिका बदलली आहे. एकदा आघाडी तर एकदा युतीच्या गोठात जावून निवडणूक जिंकली आहे. यावेळी राजू शेट्टी यांचा हा ‘स्वाभिमान’ सर्वसामान्य मतदारांना लक्षात आला आहे. तसेच त्यांचे ऐककाळचे सहकारी सदाभाऊ खोत यंदा त्यांचे विरोधक म्हणून कार्यरत असणार आहेत. अशा सर्व परिस्थितीत राजू शेट्टी यांचा ‘स्वाभिमान’ पणाला लागणार आहे. या मतदारसंघातून युतीचे धैर्यशील माने यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. शिवसेनेचे उमदेवार माने यांना जिंकून आणण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे या ठिकाणी शड्डू ठोकून बसले आहेत.

हातकणंगले मतदारसंघात मागील २ लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी विजय मिळवला आहे. मात्र त्यासाठी त्यांनी प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा आधार घेतला आहे. २००४ मध्ये त्यांना दोन्ही काँग्रेसचा पाठिंबा होता, २०१४ मध्ये त्यांनी भाजप-सेना युतीमध्ये प्रवेश केला होता. आता ते पुन्हा युतीमधून बाहेर पडून दोन्ही काँग्रेसच्या महाआघाडीत गेले आहेत. अशा प्रकारे राजू शेट्टी यांना दरवेळी अन्य पक्षीय पाठिंब्याने या लोकसभा मतदारसंघात जिंकता आले आहे. शेतकर्‍यांचे प्रश्न घेऊन राजू शेट्टी यांनी त्यांचे राजकीय प्रस्थ निर्माण केले, मात्र दर पाच वर्षांच्या निवडणुकीत विरोधी गटाला पाठिंबा देऊन विरोधी गटासोबत पुढील ५ वर्षे सत्तेत रहायचे त्यानंतर पुन्हा निवडणूक आली की, सत्ताधार्‍यांशी झगडा करून पुन्हा त्यांच्या विरोधी पक्षांना पाठिंबा देऊन सत्तेत यायचे, असा खेळ सुरू केला आहे. उदा. २००९ मध्ये राजू शेट्टी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन खासदार बनले, पुढे २०१४च्या निवडणुकीवेळी काँग्रेसशी झगडा करून भाजप-सेना युतीत आले, ५ वर्षे सत्तेत राहिले आणि २०१९मध्ये युतीशी झगडा करून पुन्हा दोन्ही काँग्रेस महाआघाडीत सामील झाले. राजू शेट्टी यांचा ज्या दिशेने वारा त्या दिशेने वळण्याचा प्रकार आता जनतेच्या लक्षात आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर जाहीरपणे यावर वाच्यता केली. शेतकर्‍यांच्या प्रश्नांच्या नावाने दरवेळी पक्षीय भूमिका बदलणे राजू शेट्टी यांना यावेळी महागात पडेल, असे पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच या वेळी राजू शेट्टी यांचे एकेकाळचे सहकारी सदाभाऊ खोत हे यंदा त्यांचे विरोधक म्हणून कार्यरत असणार आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यांच्या विरोधकांमध्ये एकाची भर पडलेली आहे. शेतकर्‍यांच्या विशेषत: ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नावर राजू शेट्टी यांनी आजवर राजकीय भूमिका घेत शेतकरी समुदायाची मने आपल्या बाजुने वळवली, सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात चंद्रकांत पाटील विशेष लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यांना यावेळी शेतकर्‍यांचा किती पाठिंबा मिळतो हे पहाणे उत्सूकतेचे ठरणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला आहे, परंतू त्या अवतीभवतीच्या अर्थात कोल्हापुर, सांगली मतदार संघातील पक्षांतर्गत वादावादी मिटवण्यातच दोन्ही काँग्रेस नेत्यांचा वेळ वाया जात असल्याने ते राजू शेट्टी यांच्या प्रचारसाठी किती वाट्याला येतात, हाही प्रश्न आहे.

महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र माने यांना महाडिक युवाशक्तीचे संस्थापक सम्राट पाटील यांनी विरोध केला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचाराबाबत आम्हाला कोणीही गृहित धरू नये, असा पवित्रा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सम्राट महाडिक यांनी घेतल्यानंतर भाजप-शिवसेनेच्यावतीने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष व विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी पेठनाक्यावरील सम्राट बंगल्यावर धाव घेतली. तेथे नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांची भेट घेऊन युतीच्याच प्रचारासाठी तयारी ठेवावी, अशी विनंती केली.

खोत आणि नानासाहेब महाडिक यांची बंद खोलीतही चर्चा झाली. महाडिक युवा शक्तीचे संस्थापक सम्राट महाडिक व पंचायत समितीचे गटनेते राहुल महाडिक यांनी यावेळ शिराळा आणि इस्लामपूर या दोन विधानसभा निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव मांडला आहे. दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी गेल्या दोन-तीन वर्षापासून तयारी चालविली आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमातून त्यांनी जनसंपर्क वाढविला आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत अशा प्रकारे विरोधी भूमिका घेत एकप्रकारे महाडिक यांनी विधानसभेचा संदेश सेना-भाजपला दिला आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेसाठी आश्वासन दिल्याने तुर्तात सम्राट महाडिक यांची नाराजी दूर झालेली आहे.

अशा प्रकारे हातकणंगले या लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांचे समाजकार्य आणि शेतकर्‍यांचे संघटन पाहता त्यांचे पारडे जड वाटत आहे. मात्र सेना-भाजप युती प्रत्येक जागेसाठी गंभीर आहे. त्यामुळे राजु शेट्टी यांनी महायुतीला हलक्यात घेतल्यास ते त्यांच्यासाठी अवघड ठरेल.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील ४ आणि सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ येतात. १९६२ पासून १९९८ पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसने जिंकला होता. त्यानंतर १९९९ आणि २००४ या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जागा जिंकली. २००९ आणि २०१४ या निवडणुकांमध्ये स्वाभिमानी पक्षाने ही लोकसभा जिंकली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here