घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टकोल्हापुरात युती-महाआघाडीचा चुरशीचा सामना

कोल्हापुरात युती-महाआघाडीचा चुरशीचा सामना

Subscribe

कोल्हापुरात शिवसेना-भाजपचा युतीचा लोकसभेचा प्रचाराचा नारळ थेट कोल्हापुरात फुटला आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. युतीसाठी कोल्हापुरची जागा त्यामुळे प्रतिष्ठेची बनली. युतीचे संजय मंडलिक १ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज भरला असून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र महाडिक यांना यावेळी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी उघडउघडपणे केलेला विरोध महाडिक यांच्या वाटेतील मोठा अडसर बनला आहे. त्यामुळे कालपर्यंत महाडिक यांचा मार्ग सोपा होता, तो आता चुरशीचा बनला आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँगे्रस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीकडून धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. तर शिवसेना-भाजप युतीकडून संजय मंडलिक सोमवारी, १ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सध्या या लोकसभा मतदारसंघात दोन्ही बाजूने पारडे जड असल्याचे चित्र आहे. कारण धनंजय महाडिक हे मागील ५ वर्षांपासून खासदार आहेत. जिल्ह्यात त्यांचे सामाजिक कार्य आहे. राजकीय वजन आहेच तसेच धनंजय महाडीक यांच्या घराण्याची ताराराणी आघाडीचे १५ नगरसेवक कोल्हापूर महापालिकेत आहे. ताराराणी आघाडी जरी भाजपसोबत असली तरी अंडरकरंट ताराराणीचा पाठिंबा धनंजय महाडिक यांनाच असेल. ही सर्व गणिते पाहता महाडिक यांचा यंदाचा लोकसभेचा मार्ग सुकर वाटत असला तरी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मात्र महाडिक यांच्या विरोधात शड्डु ठोकला आहे.

- Advertisement -

अशा प्रकारे डॉ. डी.वाय. पाटील साम्राज्याचे शिलेदार बंटी उर्फ आमदार सतेज पाटील आणि मुन्ना उर्फ खासदार धनंजय महाडीक यांच्यातील राजकीय संघर्ष टिटेला पोहोचला आहे. त्यामुळे सगळे काही चांगले चांगले अनुवयास येत असतानाच महाडिक यांच्या मार्गात सतेज पाटील यांच्या माध्यमातून मोठा अडसर उभा राहिला आहे. त्यामुळे महाडिक यांच्या गाडीचा वेग मंदावणार आहे, हे निश्चित आहे.

नुकतेच राष्ट्रवाद काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दोन्ही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची बैठक घेऊन समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र सतेज पाटील त्यांच्या भूमिकेपासून मागे हटलेले नाहीत. आता तर काही आठवड्यातच मतदान येऊन ठेपले आहे. अशा परिस्थितीत सतेज पाटील यांचा नकारात्मक सूर युतीच्या पारड्यात वजन टाकणारा आहे. कारण सतेज पाटील यांचे कोल्हापूर शहरात प्रचंड राजकीय वजन आहे. शहर भागात महाडिक यांना याचा थेट फटका बसू शकतो.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आपली प्रत्येक जागा सुरक्षित करण्यासाठी जोरदार पायपीट करीत असताना कोल्हापूर संदर्भात उठलेल्या चर्चेच्या नव्या वादळांमुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. ‘प्रत्येक गोष्टीची किंमत वेळ आल्यावरच कळते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजक आय.सी.यु.मध्ये दाखल झाल्यावर खूप महागात मिळतो, आता वेळ निघून गेलीये, आपलं ठरलंय!’, अशा आशयाची सतेज पाटील यांची फेसबूक पोस्ट सध्या कोल्हापुरात महाडिक यांची झोप मोड करून गेली आहे.

तर दुसरीकडे शिवसेना-भाजपने प्रचाराचा नारळ थेट कोल्हापुरातूनच फोडला गेला. मोठ्या संख्येने या ठिकाणी युतीची पहिलीवहिली प्रचारसभा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांगलीच राजकीय फटकेबाजी केली. त्यामुळे जिल्ह्यात बर्‍याच प्रमाणात युतीच्या बाजुने वातावरणनिर्मिती झाली आहे. आता कोल्हापुरातील युतीच्या प्रचाराचा अहवाल टप्प्याटप्याने मातोश्रीत पोहोचू लागला आहे. युतीच्या प्रचाराची बैठकही पार पडली. पदयात्रा, मेळावे, बैठका, सभांच्या परवानग्या या सर्व बाबतीत यावेळी साधकबाधक चर्चा केली. सर्व नेत्यांचे दौरे वरिष्ठांकडे पाठवायचे असून त्यानुसार वरूनही नेत्यांच्या दौर्‍यांचे नियोजन करण्यात येणार आहे.

यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबिटकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनीही प्रचाराच्या दृष्टीने सूचना केल्या. संजय मंडलिक हे सोमवारी १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता साधेपणाने अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी मतदारसंघातील केवळ १०० प्रमुख सेना, भाजप, आरपीआय आठवले गट, रासप, रयत क्रांतीच्या पदाधिकार्‍यांना बोलावण्यात आले आहे. यानंतर संध्याकाळी राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथील गणेश मंदिराजवळ जाहीर सभा घेऊन प्रचाराचा प्रारंभ करण्यात येणार आहे.

अशा प्रकारे युतीचा प्रचार सुनियोजितप्रकारे सुरू झाला आहे. त्यामुळे माध्यमांमध्येही सध्या कोल्हापूर लोकसभाबाबत युतीचे पारडे जड असल्याची चर्चा सुरू झाली आहे. धनंजय महाडिक यांना महाआघाडी अंतर्गत होणारा विरोध हा त्यांच्यासाठी डोकेदुखीचा ठरणार आहे. मात्र अंडरकरंट मंडलिक यांनाही विरोध सुरू असल्याची चर्चा आहे. या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे सतेज पाटील मंडलिक यांचा प्रचार करण्याची शक्यता असली तरी भाजपचा गट हा धनंजय महाडिक यांच्यासाठी प्रचार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे युतीतही सर्व काही आलबेल आहे, असे या क्षणी म्हणता येत नाही.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभांपैकी ५ विधानसभा युतीकडे आणि १ राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली आहे. कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता असून काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक जिंकून आले आहेत. त्या खालोखाल भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत मात्र भाजप आणि काँग्रेस यांनी समसमान जागा जिंकल्या आहेत, त्या खालोखाल राष्ट्रवादी आणि शिवसेनेने जागा जिंकल्या आहेत.

1952 पासून १९९८ पर्यंत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. त्यानंतर शरद पवार यांनी काँग्रेसमधून फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि १९९९ पासून २०१४ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा मतदारसंघ जिंकला आहे. २०१४ मध्ये मोदी लाट असूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय महाडिक या ठिकाणी विजयी झाले होते. २०१९मध्येही राष्ट्रवादीने पुन्हा धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे.

एकूण मतदार
पुरुष – ९ लाख ९ हजार ३२६
स्त्री – ८ लाख ४८ हजार ९७४
एकूण – १ कोटी ७ लाख ५८ हजार ३००

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -