वीज प्रवाह वाढल्याने बँकेतील वस्तूंचे नुकसान

Mumbai

महावितरणच्या येथील अनागोंदी कारभारामुळे दरबार रोड परिसरातील असंख्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. बुधवारी रात्री साडेअकरा वाजता या भागातील वीज प्रवाह अचानक वाढल्याने पेटते बल्ब आपोआप फुटले, तर आयडीबीआय बँकेचा एक मोठा स्टॅबिलायझर, युपीएस सर्विस रूम जळून खाक झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या बँकेचे संगणक, वातानुकूलित यंत्रे व पंखे इत्यादी साहित्याचे नुकसान झाल्याने तेथील व्यवहार काही काळ ठप्प झाले.

याबाबत बोलताना बँकेच्या अधिकार्‍याने सांगितले की, वीज पुरवठ्याबाबत आठ दिवसांपासून महावितरणच्या अधिकार्‍याचे याकडे लक्ष वेधूनही कोणतीच दाद घेतली न गेल्यामुळे बँकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वीज प्रवाह वाढल्यामुळे समुद्र किनारी असलेले हॉटेल गुरूप्रसादलासुद्धा मोठा आर्थिक फटका बसला आहे. या हॉटेलचे आठ बल्ब, एक फ्रिज, तीन पंखे, एक मोठा एलईडी टीव्ही व अन्य इलेक्ट्रिक सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत बोलताना हॉटेलचे मालक दामोदर बैले यांनी याला महावितरणचा बेजबाबदार कारभार कारणीभूत असल्याचे सांगून नुकसान भरपाईची मागणी केली.

मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी यांनी सांगितले की, शहरासह तालुक्यात वीज प्रवाह वाढण्याची ही पहिलीच वेळ नाही. यात महागड्या इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिकच्या वस्तूंना हानी पोहचत असली तरी ग्राहकाला कोणतीही नुकसान भरपाई दिली जात नाही. महावितरणने ग्राहकाला भरपाई देण्याची कायद्याने तरतूदीची मागणी करणारे निवेदन अधीक्षक अभियंता (पेण) व रोहे येथील कार्यकारी अभियंता याना दिले आहे. परंतु भरपाई देण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. या संदर्भात लवकरच राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांची भेट घेतली जाणार असल्याचे फकजी यांनी सांगितले.