युवकाच्या प्रामाणिकपणामुळे हरवलेली पैशांची बॅग सापडली

Nashik

बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना ४२ हजार रूपयांची रोकड व दोन मोबाईल असलेली बॅग हरविल्याने मनिषा नितीन आडके यांच्या डोळ्यांसमोर अंधेरीच आली होती. मात्र, युवकाची तत्परता व प्रामाणिकपणामुळे अवघ्या अर्ध्या तासात बॅग पैशांसह परत मिळाल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला. आडके यांनी नाशिकरोड पोलीस व युवकाचे आभार मानले.

मनिषा नितीन आडके (रा. अभिनंदन लॉन्स, लॅमरोड, देवळाली कॅम्प) या शनिवारी (दि.६) सकाळी १० वाजेच्या सुमारास लॅमरोडने देवळाली कॅम्पमधील बँकेत भरणा करण्यासाठी जात होत्या. दुचाकीवरुन जात असताना त्यांची रोकड, दोन मोबाईल व महत्वाची कागदपत्र असलेली बॅग ओरिएंट गेस्ट हाऊसच्या समोर पडली. त्यावेळी देवळाली कॅम्पकडून नाशिकरोड कडे जाणारा सुनील ननसू साळवे (रा. शिगवे बहुला) याच्या बॅग पडल्याचे लक्षात आले. त्याने दुचाकी वळवुन बॅग उचलून पोलीस ठाण्यात आणून दिली. पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू निसाळ यांच्या हस्ते आडके यांना त्यांची बॅग परत केली. बॅगेत ४२ हजार १७० रुपये व दोन मोबाईल व कागदपत्रे सुरक्षित असल्याचे पाहून आडके यांनी युवकाच्या प्रामाणिकपणाबद्दल आभार व्यक्त करत बक्षीस दिले.