घरमहाराष्ट्रभक्तीमय वातावरणात माघी गणेशोत्सव साजरा

भक्तीमय वातावरणात माघी गणेशोत्सव साजरा

Subscribe

माघी गणेशोत्सव मंगळवारी भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. अष्टविनायक क्षेत्रापैकी पाली, महड यासह ठिकठिकाणी भक्तांनी गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासून प्रचंड गर्दी केली होती. यानिमित्ताने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

यावर्षी माघी गणेशोत्सव अर्थात गणेश जयंती मंगळवारी आल्याने अंगारक योग जुळून आला होता. 2020 मध्ये अंगारक चतुर्थी नसल्याने स्वाभाविक भक्तांनी अपेक्षेप्रमाणे दर्शनासाठी गर्दी केली होती. अष्टविनायकांपैकी पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिरात सोमवारी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी झाली होती. थंडीची पर्वा न करता हजारो अबालवृद्ध पुरुष-महिला दर्शन रांगेत उभे होते. रायगड जिल्ह्यासह अन्य ठिकाणांहून मोठ्या संख्येने भक्त दर्शनासाठी आले होते. यानिमित्ताने यात्राही भरल्याने आलेल्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शहरात आलेल्या भाविकांसाठी श्री बल्लाळेश्वर देवस्थानकडून नाष्टा आणि चहा, महाप्रसादाची सोय, तसेच विक्रम स्टँडपासून मंदिरापर्यंत मोफत वाहतूक सेवा देवस्थानकडून करण्यात आली होती. कमी खर्चात निवासाची सोय करण्यात आली होती.

- Advertisement -

श्री क्षेत्र महड येथील श्री वरद विनायकाच्या मंदिरात गणेश जयंती उत्साहात साजरी झाली. पहाटेपासून दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या उरण तालुक्यातील चिरनेर येथील श्री महागणती मंदिरात स्थानिकांसह दूरदूरहून आलेल्या भक्तांची गर्दी झाली होती. माणगाव तालुक्यातील मुगवली, दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिर या ठिकाणी माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. नागोठणे येथील श्री सिद्धीविनायक मंदिरात माघी उत्सव उत्साहात साजरा झाला. अभिषेक, होम, पालखी असे कार्यक्रम यानिमित्ताने पार पडले.

अलिबाग येथील कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन श्री सिद्धीविनायक मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. पहाटे काकडआरतीने या उत्सवाला प्रारंभ झाला. सकाळी लवकर ओहोटीची वेळ साधत भाविकांनी गणेश पंचायतनाचे दर्शन घेतले. यानिमित्ताने किल्ल्यात ठिकठिकाणी रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. संपूर्ण किल्ल्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळी भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात अन्य ठिकाणीही माघी गणेशोत्सव उत्साहात पार पडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -