आज आचारसंहिता जाहीर होणार नाही; २०१४ ला काय झालं होतं?

Mumbai
State Election Commission organised two day International Council
राज्य निवडणूक आयोग

लोकसभा निवडणूक संपल्यानंतर महाराष्ट्राला वेध लागले होते ते विधानसभा निवडणुकीचे. विद्यमान १३ व्या विधानसभेची पहिली विधीमंडळ बैठक १० नोव्हेंबर २०१४ रोजी झाली होती. विधानसभेचा कार्यकाळ हा ९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपत आहे. त्यामुळे त्याआधीच १४ वी विधानसभा गठित होणे अपेक्षित आहे. त्यानुसार आता निवडणुक आयोग आपले वेळापत्रक जाहीर करणार आहे. आज राज्य निवडणूक आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदेत केवळ निवडणुकीचा आढावा, मतदरांची माहिती दिली आहे. मात्र आज आचारसंहिता जाहीर होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाहीत. कारण विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोग दिल्लीमध्ये जाहीर करत असतो, असे मंत्रालयातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने आपलं महानगरशी बोलताना सांगितले. २० सप्टेंबर रोजी आचारसंहिता जाहीर होऊ शकते. आचारसंहिता जाहीर केल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आयोगाला किमान ३५ दिवसांच्या कालावधी लागत असतो. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये दिवाळीआधी राज्याला नवे सरकार मिळेल अशी शक्यता वाटत आहे.

महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातनंतर आचारसंहिता जाहीर?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाजनादेश यात्रा काढण्यात आली आहे होती. या यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याचा समारोप १९ सप्टेंबरला नाशिक येथे होत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्वतः उपस्थित राहणार असून तपोवन येथील सभेला दोन्ही नेते संबोधित करणार आहेत. मोदींच्या या सभेनंतरच आचारसंहितेची घोषणा होईल, अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे. आचारसंहितेचा अंदाज घेऊन राज्य सरकारने मागच्या आठवड्यात विकास कामांच्या निर्णयांचा एकच धडाका लावला होता. ९ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ३७ तर त्या अगोदर झालेल्या बैठकीत २५ विविध विकास कामांच्या विषयांना मंजुरी देण्यात आली होती. आचारसंहितेपुर्वी योजनांच्या घोषणा करण्याचा सरकारचा वेग वाढल्याचे दिसत आहे.

२०१४ साली काय झालं होतं?

२०१४ साली १२ सप्टेंबर रोजी निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली होती. तर २० सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी झाली. त्यानंतर विधानसभेसाठी १५ ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात सर्व २८८ मतदारसंघात निवडणूक झाली होती. तर १९ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता.

आचारसंहितेपुर्वी मेगाभरतीला उधाण

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी भाजप-शिवसेनेने इतर पक्षांतील महत्त्वाच्या नेत्यांना आपले दरवाजे खुले केले आहेत. भाजपतर्फे आज तिसरे मोठे इनकमिंग केले जाणार आहे. मुंबईतील गरवारे क्लब येथे दुपारी २ वाजता काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटील, सत्यजीत देशमुख आणि कृपाशंकल सिंह यांना प्रवेश दिला जाणार आहे. तर नवी मुबंईतील कार्यक्रमात गणेश नाईक यांच्यासह ५५ नगरसेवकांना प्रवेश दिला जाणार आहे. तर १९ सप्टेंबरच्या पुर्वी पुन्हा एकदा विधानपरिषदेचे आमदार आनंदराव पाटील, राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे आणि राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या पक्षप्रवेशाबद्दल अंतिम निर्णय घेण्यात येईल.

युती, आघाडी आणि जागावाटपाच्या मॅरेथॉन बैठका सुरु

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या युती-आघाडीच्या चर्चांना देखील वेग आला आहे. गतवेळी शेवटच्या क्षणी भाजप-सेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची घोषणा करण्यात आलेली होती. मात्र यावेळी अद्याप तरी युती-आघाडीमध्ये आलबेल असल्याचे चित्र निर्माण केलेले आहे. मात्र १९ सप्टेंबरपर्यंत अंतिम चित्र स्पष्ट होईल.