घरमहाराष्ट्रयुती होऊनही मुंबईत काँग्रेसचे गड अभेद्य

युती होऊनही मुंबईत काँग्रेसचे गड अभेद्य

Subscribe

ठाणे-भाजपचा वरचष्मा,पालघर-बविआची शिट्टी ,रायगड-शिवसेनेची मुसंडी

शिवसेना आणि भाजपची युती झाली असली तरी मुंबईत मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपची एक जागा वाढली असून शिवसेनेची एकही जागा वाढलेली नाही. मुंबईतून काँग्रेसचा सुफडा साफ करण्यासाठी शिवसेना आणि भाजपची युती झाली असली तरी प्रत्यक्षात काँग्रेसची फक्त एक जागा कमी झाली, ही एक जागा कमी झाली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा वाढल्याने आघाडीच्या आमदारांचा आकडाही मुंबईत कायम राहिला आहे. ठाण्यात मात्र भाजपचे वर्चस्व राहीले असून पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीने ३ जागा मिळवल्या आहेत तर रायगडमध्ये सेनेने मुसंडी मारली आहे.

वरळीत निवडून येत आदित्य ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबातील सदस्य असलेला पहिला आमदार बनवण्याचा मान मिळवला आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यात युतीला पाच जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे शेकापकडील अलिबाग आणि पेण या दोन जागा हातच्या गेल्या. ठाण्यात भाजपला आठ, सेनेला पाच, राष्ट्रवादीला दोन, मनसे १, सपा.१ आणि अपक्ष एक असे बलाबल आहे. पालघरमधील सहा जागांपैकी बहुजन विकास आघाडीला तीन, राष्ट्रवादीला एक, माकपला डहाणू, पालघरची जागा सेनेने राखली.

- Advertisement -

मागील विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवताना शिवसेनेचे १४ तर भाजपचे १५ आमदार निवडून आले होते. परंतु या निवडणुकीत शिवसेनेने १९ जागा तर उर्वरित १७ जागांवर भाजपने निवडणूक लढवली होती. त्या तुलनेत शिवसेनेने १९ जागांपैंकी १४ जागा जिंकल्या तर भाजपने १७ जागांपैकी १६ जागा जिंकल्या. ठाणे जिल्ह्यातील १८ जागांमधील भाजपकडे ९, सेनेकडे ६ आणि राष्ट्रवादी ४ असे बलाबल होते. या निवडणुकीत मीरा-भाईंदरच्या जागेवर पाणी सोडावे लागले. नरेंद्र मेहता यांच्याविरोधात असलेल्या तक्रारींचा फटका भाजपला बसला. उल्हासनगरला कुमार आयलानी, कल्याण(पू) गणपत गायकवाड, मुरबाडमध्ये किसन कथोरे, ठाण्यात संजय केळकर, ऐरोली येथे गणेश नाईक आणि बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे, भिवंडी (प) महेश चौगुले, डोंबिवली रवींद्र चव्हाण या जागा भाजपकडे आल्या. कल्याण(पू) ही जागा प्रथमच मनसेने जिंकली.

पालघर जिल्ह्यात सहापैकी चार नवे चेहरे निवडून आले. यात बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील(बोईसर), सेनेचे श्रीनिवास वणगा(पालघर), राष्ट्रवादीचे सुनील भुसारा(विक्रमगड) आणि माकपचे विनोद निकोले(डहाणू) यांचा समावेश आहे. या जिल्ह्यात भाजपला डहाणू आणि विक्रमगड या जागांवर पाणी सोडावे लागले.

- Advertisement -

रायगड जिल्ह्यात भाजपने बर्‍यापैकी आघाडी घेतली. पनवेलची जागा त्या पक्षाने राखलीच. पण पेणची जागा नव्याने त्या पक्षात आलेल्या रवी पाटील यांनी जिंकली. रवी पाटील यांना १ लाख ११ हजार ३०९ मते पडली. रवी पाटील यांचा २३ हजार ५९५ मतांनी विजय झाला. सेनेकडील उरणची जागा भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी सुमारे पाच हजार ९१८ मतांच्या फरकाने जिंकली. सेनेचे मनोहर भोईर यांना ६८ हजार ७४५ मते पडली. आश्चर्याची बाब म्हणजे विधानसभेच्या निर्मितीनंतर शेकापकडे असलेली अलिबाग विधानसभा मतदारसंघाची जागा सेनेचे महेंद्र दळवी यांनी जिंकली.

शेकापचे पंडित पाटील यांचा त्यांनी सुमारे ३२ हजार मतांनी पराभव केला. रायगड जिल्ह्यातून शेकाप पूर्णत: बाहेर गेला आहे. महाडची जागा सेनेचे भरत गोगावले यांनी सुमारे २१ हजार मतांनी जिंकली. राष्ट्रवादीकडील कर्जतची जागा सेनेचे महेंद्र थोरवे यांनी खेचून घेतली. लाड यांचा १८ हजार ३३ मतांनी पराभव झाला. श्रीवर्धनची जागा राष्ट्रवादीला राखण्यात यश आले. राष्ट्रवादीच्या उमेदवार आदिती तटकरे यांनी सेनेचे विनोद घोसाळकर यांचा सुमारे ३६ हजार मतांनी पराभव केला.

मुंबई
भाजप १६
शिवसेना १४
काँग्रेस ४
राष्ट्रवादी १
मनसे ०
इतर १

ठाणे
भाजप ८
शिवसेना ५
काँग्रेस ०
राष्ट्रवादी २
मनसे १
इतर २

रायगड
भाजप २
शिवसेना ३
काँग्रेस ०
राष्ट्रवादी १
मनसे ०
इतर १

पालघर
भाजप ०
शिवसेना १
काँग्रेस १
राष्ट्रवादी ०
बविआ ३
इतर १

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -