घरमहाराष्ट्रपंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यावरून वडेट्टीवार - सदाभाऊ खोत यांच्यात कलगीतुरा 

पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यावरून वडेट्टीवार – सदाभाऊ खोत यांच्यात कलगीतुरा 

Subscribe
अर्थसंकल्पातील अनुदानासाठीच्या मागण्यांवर चर्चा करत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राज्याचे मंत्री दुष्काळ दौरे काढत असताना पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतात. जनतेची कामे केली म्हणून उंट-घोड्यावर मिरवणूक काढून घेत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. मात्र वडेट्टीवारांचा हा आरोप सदाभाऊ खोत यांना चांगलाच झोंबला. शेतकर्‍यांच्या मुलांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये जायचेच नाही का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर काही काळ दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले.
सदाभाऊ खोत यांनी वडेट्टीवार यांच्या आरोपाचे उत्तर देताना सांगितले की, दुष्काळ दौऱ्यासाठी मी रेल्वेने औरंगाबादला गेलो होतो. आचारसंहिता लागली असल्याने शासकीय गेस्ट हाऊस उपलब्ध नव्हते. त्यामुळे फक्त फ्रेश होण्यासाठी मी तासभर पंचतारांकित हॉटेलमध्ये गेलो होतो, असे स्पष्टीकरण दिले. त्यावर तुम्हाला फ्रेश होण्यासाठी देखील पंचतारांकित हॉटेलच लागते का? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी विचारताच शेतकर्‍यांच्या मुलांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये जायचे नाही का? असे उत्तर दिले.
तसेच माझी उंटावरून मिरवणूक जनतेने काढली होती. आम्ही काम केले म्हणून आमची मिरवणूक निघतेय. विरोधकांची तर तीही निघत नाही, असा टोमणा मारला. तर पंचतारांकित हॉटेलात रहा, उंटावरून मिरवणूक काढा. मात्र राज्यात दुष्काळ आहे, याची जाणीव ठेवा, असा पलटवार वडेट्टीवार यांनी केला. त्यानंतरही हे वाकयुद्ध सुरुच होते. त्यामुळे विधानसभेचे उपाध्यक्ष विजय अवटी यांनी हस्तक्षेप करत विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपांना मंत्र्यांनी आपल्या भाषणात उत्तर द्यावे, असे निर्देश दिले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -