‘अध्यक्षांनी बोलावलं, तर मंत्री पँट सावरत पळत आले पाहिजेत..’.

सभागृहात गैरहजर मंत्र्यांबद्दल आ. जाधव यांची मिश्किल टिप्पणी

Mumbai

विधानसभा अध्यक्षांनी बोलावलं, तर मंत्र्यांनी पँट सावरत सभागृहात पळत आलं पाहिजे, आम्ही मंत्री असताना अध्यक्षांनी बोलावल्यास पळत यायचो…’ राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्यांनी दुपारी विधानसभेच्या सभागृहात खसखस पिकली.

अर्थसंकल्पातील तरतुदींवर आज सभागृहात सदस्यांनी मते मांडली. . जाधव यांनीही मत मांडले, मात्र मध्येच त्यांना कृषी, पशुसंवर्धन व मत्स्यविकास या खात्याशी संबंधित चर्चा करायची होती. त्यांनी संबंधित खात्याच्या चर्चेला प्रारंभ करून सत्ताधारी बाकाकडे पाहिले असता, तिथे मंत्री महादेव जानकर आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर जागेवर नसल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी चार ते पाच मिनिटे आपले भाषण थांबविले.

मंत्री सभागृहात नसल्याची कुणाशी चर्चा करायची? सरकारच्या वतीने या खात्याबद्दल कोण ऐकणार असा प्रश्न निर्माण झाला. राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनीही मंत्रीमहोदयांना बोलवावे अशी विनंती अध्यक्षांना केली.

तेव्हा अध्यक्षांनी हातातील चिठ्ठी उंचावरून त्यांना निरोप पाठविला आहे, तुम्ही भाषण सुरू ठेवावे असे आ. जाधव यांना संबोधून सांगितले. मात्र त्यानंतरही चार पाच मिनिटे मंत्री जानकर न आल्याने आ. जाधव यांनी मंत्र्यांबद्दल ही खुशखुशीत टिपण्णी केली.

दरम्यान पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांचेच कसे भले होते? कोकणातील फळपीक योजना ही हवामानआधारित कशी असली पाहिजे यासह कोकणातील शेतकरी व मच्छीमारांची समस्या मांडत काही सूचना सभागृहात दिल्या. त्यांचे भाषण सुरू असतानाच मंत्री जानकर यांचे आगमन झाले.