कोरोनामुक्त होणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रच आघाडीवर!

Death Dead died Due to Coronavirus
प्रातिनिधिक छायाचित्र

देशासह महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तर दुसरीकडे कोरोनामुक्त होण्याच्या संख्येतही दररोज भर पडत असल्याचं दिसून येत आहे. मागील चोवीस तासांमध्ये देशभरात ७८ हजार ३९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत राज्य आघाडी कायम आहे. राज्यात १३ हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे.

महाराष्ट्राच्या खालोखाल कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो, या ठिकाणी एका दिवसात १० हजारापेक्षा अधिक रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जवळपास ५७ टक्के नवे कोरोनाबाधित हे पाच राज्यांमधील आहेत. तर कोरानामुक्त झालेल्या एकूण संख्येतील ५८ टक्के रूग्ण देखील पाच राज्यांमधील आहेत.

मागील चोवीस तासांमध्ये देशभरात ७८ हजार ३९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची देशभरातील संख्या आता ३७ लाख २ हजार ५९५ वर पोहचली आहे देशातील रूग्णबरे होण्याचे प्रमाण ७७.८८ टक्क्यांवर आहे. यामधील ५८ टक्के बरे झालेले रुग्ण हे महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश येथील असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.

देशातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मे महिन्यात ५० हजारांवर असलेली कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सप्टेंबरमध्ये ३६ लाखांवर पोहचली आहे. दिवसाकाठी साधरणपणे ७० हजार रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्येच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३.८ पट अधिक आहे. देशभरात १२ सप्टेंबरपर्यंत ५,६२,६०,९२८ नमूने तपासण्या झाल्या आहेत. यातील १० लाख ७१ हजार ७०२ नमूने काल तपासण्यात आले.