घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रद्रोही BJP ट्रेंड ट्विटरवर टॉप

महाराष्ट्रद्रोही BJP ट्रेंड ट्विटरवर टॉप

Subscribe

भाजपच्या आंगण रणांगणच्या आंदोलना विरोधात महाविकास आघाडीनेही महाराष्ट्रद्रोही-BJP हे ट्विटर वॉर सुरू केले. राज्यात करोनाचे संकट असताना भाजपमार्फत राजकारण होत असल्याची टीका करत ट्विटरवर ट्विट्सचा पाऊसच पडला. १ लाखांहून अधिक ट्विट्स महाराष्ट्रद्रोही-BJP हा हॅशटॅग वापरून करण्यात आल्या. त्यामध्येच छोट्या मुलांनाही आंदोलनात सहभागी केल्याने ट्विटरवर टिकेची झोड उडाली. भाजपमार्फत सुरू झालेल्या मेरा आंगण-रणांगण आंदोलनात भाजपने रस्त्यावर उतरून ताकद लावली. तर महाविकास आघाडीच्या ट्विटर आर्मीनेही सोशल मीडियावर जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

भाजपच्या मेरा आंगण रणांगण आंदोलनात भाजपच्या बड्या नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्यासह भाजपमधील अनेक पदाधिकार्‍यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनासाठी सहभाग दाखवला. पण दुसरीकडे ट्विटरवरही महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी भाजपच्या या आंदोलनाचा समाचार घेतला. आदित्य ठाकरे यांच्यासह बाळासाहेब थोरात, मनिषा कायंदे यांच्यासह अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टिकेची झोड उडवली आहे. करोनाच्या संकटाच्या काळात भाजपकडून राजकारण सुरू झाल्याने ट्विटरवर भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असे ट्विटर युद्ध पहायला मिळत आहे.

- Advertisement -

करोनाला विसरून गेले. कारण राजकारण प्रिय आहे अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. तर भाजपचे आंदोलन राजकीय नैराश्यातून अशी टीका शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे यांनी केली आहे. खरंच देवेंद्र भौ, आमचे चुकलेच. आम्ही टाळ्या, थाळ्या वाजवल्या नाहीत, बेडूक उड्या, कोलांट उड्या मारल्या नाहीत, दिवे घालवून दिवे जाळले नाहीत, वारंवार भाजप, सॉरी राज्यपाल यांच्याकडे गेलो नाही, देवेंद्र भौ आमचे खरंच चुकले, अशी टीका मनिषा कायंदे यांनी केली आहे. तर भाजपमधील महाराष्ट्रातील नेतृत्व हे राज्यात सरकारला करोनाच्या संकटात मार्ग काढण्यापेक्षा अडचणी वाढवण्याचे काम करत आहे अशी टीका काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

ट्विटरवर काही युजर्सनेदेखील करोनाविरोधात काम करणार्‍या आरोग्य यंत्रणेच्या कर्मचार्‍यांचे कौतुक केले आहे. तर सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे समर्थनातील ट्विटदेखील करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात टीका करणारी भाजप ही गुजरातमधील अपयशाबाबत का मुग गिळून गप्प आहे अशी टीकादेखील काही ट्विटर युजर्सने केली आहे. तर भाजपने छोट्या मुलांना आंदोलनात उतरवल्यासाठी राजकीय पक्ष तसेच सर्वसामान्य युजर्समार्फतदेखील टीका करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -