घरदेश-विदेशमहाराष्ट्रातील जलाशयांवरही आता फ्लोटिंग सौरऊर्जा निर्मिती

महाराष्ट्रातील जलाशयांवरही आता फ्लोटिंग सौरऊर्जा निर्मिती

Subscribe

देशात सौर निर्मितीसाठी सर्वाधिक क्षमता महाराष्ट्रात

भारतातील जलाशयांच्या माध्यमातून १८००० चौ किमी जलपृष्ठभागावर तरंगते सौर फोटोव्हॉल्टिक प्रकल्प उभारून २८० गिगावॉट इतकी सौर ऊर्जा निर्मिती करता येऊ शकते. द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटच्या (टेरी) नव्या अहवालातून ही माहिती प्रकाशित झाली आहे. फ्लोटिंगच्या माध्यमातून सौर ऊर्जा निर्मिती करण्याची सर्वाधिक क्षमता महाराष्ट्रात आहे. राज्यातील जलाशयांमधील ३१७३ चौ किमी जलपृष्ठभागावर सौर पीव्हीच्या माध्यमातून ५७८९१ मेगावॉट इतकी सौर ऊर्जा निर्मिती करता येऊ शकते, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांचा क्रमांक आहे.

एनर्जी ट्रान्समिशन कमिशन (ईटीसी) इंडियाचा भाग म्हणून टेरीने ‘फ्लोटिंग सोलार फोटोव्हॉल्टिक (एफएसपीव्ही) : अ थर्ड पिलर टु सोलार पीव्ही सेक्टर?” हा अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालासाठी केलेल्या अभ्यासांतर्गत विकसित करण्यात आलेल्या इंडिया फ्लोटिंग सोलार पीव्ही-टूल या वेबआधारित इंटरॅक्टिव्ह टूलच्या माध्यमातून फ्लोटिंग सोलार क्षमतांचा राज्यनिहाय तपशीलही देण्यात आला आहे.

- Advertisement -

देशातील मध्यम व मोठ्या आकाराच्या जलाशयांच्या जलपृष्ठभागाच्या ३० टक्के या प्रमाणे या अहवालात फ्लोटिंग सोलार फोटोव्हॉल्टिक्स (एफएसपीव्हीज) किंवा ‘फ्लोटोव्हॉल्टिक्स’साठीची क्षमता निर्धारित करण्यात आली आहे. सध्या भारतातील ग्रिडशी जोडण्यात आलेल्या सोलार पीव्ही क्षेत्रात जमिनीवरील प्रकल्पांचे प्रमाण ९३.१ टक्के आहे. मोठ्या ऊर्जा कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या सौर प्रकल्पांचा स्थापना खर्च २०१० ते २०१८ या कालावधीत तब्बल ८४ टक्क्यांनी घटला आहे. त्यामुळे भारत हा युटिलिटी स्केल सोलार पीव्हींसाठी सर्वात कमी स्थापित खर्च येणारा देश ठरला आहे.

मात्र, सोलार पीव्ही बसवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन लागते आणि प्रकल्पाचा व्यापक विस्तार करायचा असेल तर मोठ्या प्रमाणावर सलग जमिनीची उपलब्धता आवश्यक असते. त्यामुळे सौर क्षमता विस्ताराचे जे राष्ट्रीय उद्दिष्ट भारताने निश्चित केले आहे, त्याच्या पूर्ततेसाठी फ्लोटिंग सोलारसारख्या पर्यायांची चाचपणी करून त्यांच्या स्थापनेसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. जगभरातील वार्षिक फ्लोटिंग सोलार क्षमता विस्तार २०१८ मधील १.३१४ गिगावॉट-पीकवरून २०२२ मध्ये ४.६ गिगावॉट-पीकपर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. फ्लोटिंग सोलारच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चीन हे आघाडीचे राष्ट्र असून त्यापाठोपाठ जपान आणि दक्षिण कोरियाचा क्रमांक लागतो. भारतात देखील मोठ्या आकाराच्या जलाशयांची उपलब्धता असल्यामुळे एफएसपीव्ही प्रकल्पांच्या विकासाची क्षमता मोठी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -