‘परिवहन कायदा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य’

हिंगोलीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते पार पडले.

Hingoli
diwakar-raote
परिवहनमंत्री दिवाकर रावते

”वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने दररोज अनेक अपघात होतात. यामुळे अनेक कुटूंब उध्वस्त होतात. त्याकरीता या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी परिवहन कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे,” असे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारत उद्घाटनप्रसंगी परिवहन मंत्री दिवाकर रावते बोलत होते. यावेळी रस्ते अपघातात तरुणांचे सर्वाधिक बळी जातात. तेव्हा तरुणांनी स्वतःच स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहनसुद्धा दिवाकर रावते यांनी यावेळी केले. यावेळी एसटीमध्ये करण्यात आलेल्या महत्त्वाच्या बदलांबाबतही दिवाकर रावते यांनी माहिती दिली.

रस्ते अपघातात तरुणांची संख्या सर्वाधिक

यावेळी रावते म्हणाले की, ”आजची पिढी ही भौतिक व वैचारिक दृष्टीने गतिमान आहे. राज्यात सुमारे ३ कोटी २७ लाख वाहने असून, त्यात पावणे दोन कोटी वाहने ही दुचाकी आहेत. त्यांचे अपघाताचे प्रमाण जास्त आहे. आज जे रस्ते अपघात होतात, त्यात १९ ते ३५ वयोगटातील व्यक्तींचा मृत्यू होत असल्याचे निदर्शनास येते. हे त्या मृत झालेला व्यक्तीच्या कुटूंबासाठी आणि देशासाठी हानी आहे. याकरीता हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. कारण आपला देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. अपघात हे सांगून होत नसतात. त्याकरीता आपणच आपली काळजी घेणे आवश्यक आहे.”

हेही वाचा – मालेगावजवळील निळगव्हाण फाट्यावर झालेल्या अपघातात एक ठार

एसटीमध्ये महत्त्वाचे बदल

”एस. टी. महामंडळाच्या बसच्या अपघातात मृत्यू झाल्यास संबंधिताच्या कुटूंबास १० लाख रुपयांची मदत दिली जाते. याकरीता अल्युमिनियमद्वारे एस. टी. महामंडळाच्या बसची होणारी बांधणी ही आता लोखंडाद्वारे होत आहे. तसेच एस.टी. महामंडळात कामावर असताना मद्य प्राशन करुन सेवा करणाऱ्यावर दोन तासात निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,” असेही दिवाकर रावते यांनी यावेळी सांगितले. ”आजचे युग हे मुलींना क्रांती घडविण्याचे युग आहे. त्याकरीता एक वर्ष छोटे वाहन चालविण्याचा अनुभव असणाऱ्या मुलींना एक वर्षाचे प्रशिक्षण देवून वाहनचालक पदाची नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलींनी एस.टी. बस चालविण्याचा हा प्रयोग देशातील पहिला प्रयोग आहे,” असेही रावते यावेळी म्हणाले.